भोपाळ : देशात करोनाचा वेग काही अंशी कमी होताना दिसत आहे. तसेच या करोनाला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम देखील देशभरात राबवण्यात येत आहे. दरम्यान,ज्या राज्यांमध्ये करोनाचा फैलाव कमी झाला आहे. त्याठिकाणी नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात येत आहेत. याविषयीचे आदेश जिल्हा पातळीवर घेण्यात येत आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एका आदेशाची जोरदार चर्चा सुरु आहे.
मध्य प्रदेशमध्ये जारी करण्यात आलेल्या एका आदेशाने संपूर्ण राज्यात सरकारवर टीका होताना दिसत आहे. आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मोहम्मद सुलेमान यांच्या सहीने जारी केलेल्या एका आदेशात सर्वाधिक जोखीम असलेल्या लोकांचे आधी लसीकरण केले जाण्याचा आदेश काढण्यात आला. या आदेशावरून मध्यप्रदेशच्या शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारवर टीका करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हाधिकार्यांना जारी केलेल्या या आदेशात किराणा दुकान, विक्रेते, घरगुती सिलेंडर पोहोचवणारे, पेट्रोल पंप कर्मचारी, घरकाम करणाऱ्या महिला, व्यापारी, भाजी विक्रेते, दूधवाले, हातगाडीवाले, वाहन चालक मजूर आणि हॉटेलचे कर्मचारी शिक्षक केमिस्ट बँकर्स, सुरक्षारक्षक यांना लसीकरण करण्याची शिफारस करण्यात आली. यासह या यादीत सेक्स वर्कर असेही लिहिण्यात आले होते.
यावरून विरोधकांकडून आरोग्य विभाग आणि सरकारची जोरदार खिल्ली उडवण्यात आली. यानंतर जारी आदेशात गफलत झाल्यानं सलून वर्करऐवजी असा शब्द लिहिला गेल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. ही चूक सुधारून नवा आदेश जारी होईपर्यंत संपूर्ण वातावरण गोंधळून गेल्याचे पाहायला मिळाले.
मध्यप्रदेश में सेक्स वर्कर को पहले वैक्सीन,
—कहीं ये बीजेपी नेताओं की विशेष माँग पर तो नही ?शिवराज जी,
वरीयता तय करिये पर लज्जा बनी रहे,
वैसे भी अब जनता बीजेपी नेताओं के गिरते चरित्र से भलीभाँति परिचित है।“बेशर्म सरकार” pic.twitter.com/IIEAHoAdtO
— MP Congress (@INCMP) May 30, 2021
मध्य प्रदेश काँग्रेसने ट्विट करून प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. भाजप नेत्यांच्या विशेष मागणीवरून सरकारी आदेशात ही शिफारस करण्यात आली नाही ना? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
दरम्यान, या आदेशावरून जोरदार चर्चा आणि आरोप होत असतानाच त्यात बदल करून नवा आदेश जारी करण्यात आला. यात ‘सेक्स वर्कर’ ऐवजी ‘सलून वर्कर’ असा बदल केला होता. त्यासोबतच आधीच्या आदेशात गफलत झाल्यामुळे चुकीचा शब्द लिहिला गेला होता, असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिले आहे.