पुणे – महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सलग चौथ्यांदा अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत रासने यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदिप गायकवाड यांचा पराभव केला. रासने यांना 10 तर गायकवाड यांना सहा मते मिळाली. दरम्यान, रासने यांचे अध्यक्षपद केवळ 14 दिवसांसाठी असणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांची मुदत 28 फेब्रुवारीला संपली होती. तर महापालिकेची मुदत 14 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे, महापालिका प्रशासनाकडून ही निवडणूक घेण्यात आली होती. या 14 दिवसांसाठी भाजपकडून आपल्या सर्व विद्यमान सदस्यांना संधी देण्यात आली होती तर राष्ट्रवादीने आपले दोन सदस्य बदलले होते. मात्र, स्थायी समितीत सर्वाधिक 10 सदस्य भाजपचे असल्याने रासने यांचा विजय निश्चित मानला जात होता.
स्थायी समितीमध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व कॉंग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण सदस्य आहेत. त्यामुळे रासने यांची निवड ही औपचारिकता होती. तरीही भाजपने दगाफटका होऊ नये यासाठी सर्व सदस्यांना व्हीप बजावण्यात आला होता. तर रासने यांचा विजय निश्चित असल्याने मोठया प्रमाणात महापालिकेत कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. रासने यांच्या निवडीनंतर, महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक गणेश बिडकर, विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ , कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी रासने यांचे अभिनंदन केले. नगरसेवक राहूल भंडारे, राजाभाऊ लायगुडे, दिपक पोटे, धनराज घोगरे, जयंत भावे,महेश बावळे
“पक्षाच्या नेत्यांनी मला सलग चौथ्या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष होण्याची संधी दिली प्रामाणिकपणे काम करणा-या कार्यकर्त्यांना तसा न्याय मिळतो हे याचे उदाहरण आहे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद स्थायी समिती कधी बरखास्त होत नाही त्यामुळे अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती