तालुक्यात मुसळधार : भात लावणीस पुन्हा एकदा सुरुवात
वेल्हे – वेल्हे तालुका भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने येथे भातशेती केली जाते. या शेतीच्या कामासाठी गावाकडे मजूर मिळत नसताना पुण्यासारख्या शहरातून काही निसर्गप्रेमी लोक भात लावणीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वेल्ह्यात येत आहेत आणि त्यांची मदत छोटी छोटी कामे व लागवड करण्यासाठी होते आहे.
गेले तीन-चार दिवस सतत पडत असलेल्या पावसामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील भात लावणीला जोमाने सुरुवात झाली आहे, तर अनेक ठिकाणी भात लावणी पूर्णही झाली आहे. इंद्रायणी तांदळाचे आगर असलेल्या वेल्हे तालुक्यात लांबलेल्या पावसानंतर आता संततधार सुरू झाली आणि पंधरा दिवसांपासून लावणीलाही सुरुवात झाली.
मात्र मध्येच पावसाने उघडिप दिल्यामुळे लागवड केलेले पीक पाण्याअभावी सुकेल का, या चिंतेत शेतकरी वर्ग होता; पण तीन-चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून भात लावणीस वेग आला आहे. सध्याचा पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही दिवसांतच संपूर्ण तालुक्यातील भात लावणी शंभर टक्के पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही.
भात शेती करणं पारंपरिक असो किंवा आधुनिक; ते कठीण आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असूनही ही शेती केली जाते. कामगार मिळत नाहीत, खतांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पावसाच्या लहरीपणावर सर्व अवलंबून आहे. बाजारभाव मिळाला पाहिजे या बाबी आहेत. तीन-चार वर्षांपासून भात लावणीसाठी वेल्हे तालुक्यात जाते; परंतु येथील परिस्थिती पाहता खर्चाचे गणित जुळत नाही हे नक्की.
– डॉ. वैशाली अंकलेशवर, सिंहगड रोड, पुणे