सातारा – आमदार असे हिरवे स्टिकर लावून राज्यभरात फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी. वास्तविक केवळ अधिवेशनाच्या काळासाठी आमदारांना हे स्टिकर लावण्यासाठी परवानगी असताना त्यानंतरही आमदार, त्यांचे नातेवाईक राजरोजसपणे बेकायदेशीरपणे सर्वत्र फिरत असतात. अशा वाहनांवर कारवाई करुन त्यांना दंड तसेच फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा अशी मागणी सुशांत मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, याबाबत योग्य ती कारवाई 13 ऑगस्टपर्यंत न झाल्यास दि. 14 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्याकडे दि. 22 फेब्रुवारी 2023 रोजी माहिती अधिकारात अर्ज केलेला होता. त्या अर्जावर दि. 24 मार्च 2023 रोजी आमदार स्टिकर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून वितरीत करण्यात येत नाहीत असे लेखी कळवले होते. त्यानंतर दि. 5 एप्रिल 2023 रोजी माहिती अधिकारात पुन:श्च संबंधित विभागाकडे अर्ज करून गाडीवर लावण्याकामी दिल्या जाणाऱ्या स्टिकरची नियमावली, स्टिकरची छायांकित प्रत आणि एक आमदारांना वाहनासाठी दिल्या जाणाऱ्या स्टिकर्सची संख्या याबाबत माहिती मागविली होती.
त्यावर अधिवेशनाच्या कालावधीत विधानमंडळ सदस्यांना वाहनांद्वारे विधानभवन परिसरात प्रवेश करता यावा, यासाठी महाराष्ट्र विधानमंडळ, विधानभवन इमारतीचे छायाचित्र, अधिवेशन कालावधीचा महिना, वर्ष नमूद असलेली वाहन प्रवेशपत्रिका वितरीत करण्यात येते अशी माहिती लेखी देण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात विशेष करून सातारा जिल्ह्यात हिरव्या कलरचे आमदार स्टिकर लावून त्यामध्ये विधानमंडळाचा लोगो लावून जिल्ह्यातील अनेक आमदार, त्यांचे नातेवाईक राजरोसपणे संपूर्ण जिल्ह्यात फिरत असतात. त्यामुळे असे स्टिकर लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करून दंड तसेच फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा. यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यास संबंधित आमदार, विधानपरीषद सदस्य यांच्यावर अपात्रतेची आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.