पुणे – शहरासह राज्यात पुन्हा मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली. त्यामुळे पुढील चार दिवस कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रसह मराठवाडा आणि विदर्भात पाऊस बरसणार आहे. दरम्यान, पुणे शहरात पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात आज सर्वात कमी 16.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद पुणे शहरात नोंदविण्यात आली. तर ब्रह्मपुरी येथील सर्वाधिक कमाल 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील चार दिवस मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार आहे, विजांचा कडकडाट व सोसायट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल. आज, दिवसभरात मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.
दरम्यान, पुणे शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. संध्याकाळनंतर हवेत गारवा असल्यामुळे पावसाची स्थिती निर्माण झाली होती. रात्री उशीरा जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पुढील चार दिवस शहरातील हवामान ढगाळ राहिल तर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल.