सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची मूळ कंपनी मेटाने दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची तयारी केली आहे. यावेळी कंपनी 10,000 कामगारांना कामावरून कमी करण्याचा विचार करत आहे. खुद्द कंपनीनेच याची घोषणा केली आहे. मेटाने मंगळवारी जाहीर केले की ते त्याच्या कार्यसंघातून अंदाजे 10,000 कर्मचारी कमी करणार आहेत आणि प्रस्तावित 5,000 रिक्त पदे भरण्याचे देखील रद्द करण्यात आले आहे. कंपनीने चार महिन्यांपूर्वीच सुमारे 11 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.
मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीतील मोठ्या कर्मचारी कपातीचे संकेत दिले आहेत. “आम्ही आमच्या टीममधील अंदाजे 10,000 कर्मचारी कमी करण्याची आणि अंदाजे 5,000 रिक्त भरती रद्द करणार आहोत,” असे झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे. कंपनी महामारीनंतरच्या मंदीशीही झुंज देत आहे.
यापूर्वी 11 हजार लोकांना कामावरून काढण्यात आले होते –
याआधीही फेसबुकची मूळ कंपनी मेटाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुमारे 11,000 लोकांना कामावरून काढून टाकले होते. कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी टाळेबंदी होती. सप्टेंबरच्या शेवटी कंपनीने सांगितले होते की मेटामध्ये एकूण 87 हजार कर्मचारी काम करतात.