परतीच्या पावसाचा प्रकोप; शेतकऱ्यांची उडाली झोप

पिकांचे नुकसान; आणखी तीन दिवस पावसाचे?

पुणे – जिल्ह्यात परतीच्या पावसाने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. पावसाळा संपला, आता थंडी पडणार अशी शक्‍यता असताना पावसाने पुनरागमन केले. काही मिनिटांसाठीच पण जोरदार पडत असलेल्या पावसाने हाताशी आलेल्या पिकांचे आतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

यंदा सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस झाल्यामुळे अधीच मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्‍यांतील भात पिकाचे नुकसान झाले आहे. तर, दुसरीकडे पावसाअभावी पिकांसह फळझाडे जळून जाऊ नयेत, यासाठी टॅंकरने पाणी देऊन कष्टाने पिके जोपासली होती. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या या कष्टावर पाणी फेरले आहे. मागील चार दिवसांपासून दररोज सायंकाळी जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्‍यांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि.5) काही गावांमध्ये जोरदार पाऊस झाला.

तत्काळ मदत मिळवून देण्याचे प्रयत्न : देवकाते

जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांनी मंगळवारी (दि. 5) बारामती तालुक्‍यातील ओला दुष्काळाची पाहणी केली. तरडोली गावात टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कांदे खराब झाले. द्राक्षांच्या वेली उन्मळून पडल्या आहेत. या सर्व नुकसानीची पाहणी करण्यात आली. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ या नुकसानीचे पंचनामे करावे, अशा सूचना देवकाते यांनी दिल्या. तसेच शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.