पावसाच्या उघडिपने सुगीच्या कामांना वेग

चाफळ  – पाटण तालुक्‍यातील चाफळ विभागात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिकांची वाढ जोमाने झाल्याने शेतकरी सुखावला खरा परंतु सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये पाणी साठून राहिले. त्यामुळे पिके कमजोर होऊन निम्मे उत्पन्न घटल्याची परिस्थिती निर्माण झाली. सद्यस्थितीत पावसाच्या उघडीपीमुळे शिवारात सुगीच्या कामांनी वेग घेतला आहे. दरम्यान, ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होऊन साधारणपणे सत्तर टक्के उत्पन्न घटले आहे.

गत आठवड्यापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने चाफळ विभागातील केळोली, पाडळोशी व दाढोली या मुख्य खोऱ्यामधील शेतकरी अतिवृष्टीतून बचावलेल्या पिकांचा तीस टक्के उत्पन्नाचा वाटा पदरात पाडून घेण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहे. सर्वत्र भात, भुईमूग, सोयाबीन, हायब्रिड, उडीद, मूग, चवळी आदि खरीप पिके काढण्याच्या कामांची लगबग सुरु झाली आहे. घातलेला उत्पादन खर्च सुध्दा निघणे मुश्‍कील झाले आहे. अतिवृष्टीतून वाचलेला हा तीस टक्के उत्पन्नाचा मूठभर पसा वर्षभर आपल्या कुटुंबाला कसा पुरवायचा? हाही यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित काही तरी ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी ठोस निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी जोर धरीत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.