जिल्ह्यात २१ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांची माहिती

पुणे – अवकाळी पावसामुळे पुणे विभागात अंदाजे 1 लाख 36 हजार 148 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर पुणे जिल्ह्यात 21 हजार 681 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. येत्या पाच दिवसांत पंचनाम्याचे काम पूर्ण होईल आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर
यांनी दिली.

विभागीय आयुक्तांनी दोन दिवस सोलापूर व सांगली जिल्ह्यांचा दौरा केला. नुकसान झालेल्या शेतीपिकाची पाहणी केली. याविषयी माहिती देताना डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यात 65 हजार 267 हेक्‍टर, सोलापूर जिल्ह्यात 36 हजार 345 हेक्‍टर,सातारा जिल्ह्यात 11 हजार 800 हेक्‍टर व कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 55 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

या जिल्ह्यांचे प्रामुख्याने सोयाबीन, भात, जवारी, द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्याला विमा कंपनी किंवा शासनाकडून मदत केली जाणार आहे. याकरिता सर्व विमा कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली आहे. पुणे विभागात सरासरी 137.24 टक्‍के इतका पाऊस झाला असून सर्वाधिक 182.5 टक्‍के पाऊस सांगली जिल्ह्यात झाला आहे. पुणे जिल्ह्यात 158.5, सातारा जिल्ह्यात 170.86, सोलापूर जिल्ह्यात 91.75 तर कोल्हापूर जिल्हयात 120.24 टक्‍के इतका पाऊस झाला असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 1 लाख 36 हजार 148 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान

येत्या पाच दिवसांत पंचनाम्याचे काम पूर्ण होणार

पुणे विभागात 51 तालुके बाधित
पुणे विभागात एकूण 51 तालुके बाधित झाले आहे. या सर्व भागांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू असून पुन्हा पाऊस आला नाही तर हे पंचनामे येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील, हे पंचनामे करत असताना जिओ टॅगिंग फोटो काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येत आहेत. किती क्षेत्र बाधीत झाले आहे, याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या पिकाचा विमा काढलेला आहे, त्याबाबतही आम्ही वेगळी माहिती घेवून त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून घेत असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.