पुणे – शहरात सोमवारी (दि. 4) विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. दुपारी तीव्र उकाडा जाणवत होता. सायंकाळी मात्र जोरदार पाऊस सुरू झाला. पुणे जिल्ह्यात दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. सायंकाळी सातनंतर पाऊस पडल्याने नागरिकांना सुखरूप घरी पोहचता आले. काहींची मात्र, त्रेधा उडाली.
शहरातील दांडेकर पूल, स्वारगेट परिसर, पाटील इस्टेट परिसर, धनकवडी, बीबवेवाडी, शनिवार पेठ, टीळक रस्ता, अलका टाॅकीज चौक याठीकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक ठीकाणी झाडे पडली आहेत. नागरिकांची ताराबंळ उडाली आहे. काही घरांत पाणी शिरण्याचे वृत्त आहे.
बंगालच्या उपसागरापासून तामिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता.