मुंबई – अर्जेंटिना भारताशी अणुऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात सहकार्य करीत असून व्यापार, संस्कृती आणि पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक आहे, असे अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत ह्यूगो जेवियर गोबी यांनी सांगितले.
राजदूत ह्यूगो जेवियर गोबी यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अर्जेंटिनाचे मुंबईतील वाणिज्यदूत गिलर्मो एड्युआर्दो डेव्होतो, उपवाणिज्य दूत सिसिलिया मोनिका रिसोलो, अर्जेंटिना दूतावासातील राजकीय विभाग प्रमुख रेनाटो मोरालेस हे उपस्थित होते.
ह्यूगो गोबी म्हणाले, भारताप्रमाणेच अर्जेंटिनादेखील विलक्षण सुंदर देश आहे. 2019मध्ये अर्जेंटिनाच्या 2 दशलक्ष पर्यटकांपैकी केवळ 14000 पर्यटक भारतात आले, तर भारताच्या 13 दशलक्ष पर्यटकांपैकी अवघे 8000 पर्यटक अर्जेंटिना पाहण्यास आले. हे चित्र बदलून उभय देशातील परस्परांच्या पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
भारतात पर्यटनाच्या अनेक संधी असून अर्जेंटिनाने पर्यटन वाढविण्यासाठी सहकार्य करावे. अर्जेंटिनाप्रमाणेच भारतातही फुटबॉल खेळ लोकप्रिय असून अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटू मेसीचे चाहते अर्जेंटिनापेक्षा भारतात अधिक असल्याचे तसेच दंतकथा झालेले दिएगो मॅराडोना सर्वपरिचित असल्याचे भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.