मतदानाच्या टक्‍केवारीवर पावसाचे ‘विरजण’

पूर्व हवेलीत स्थानिक नेत्यांकडून चिंता : मतदानाचा टक्‍का घटणार?

लोणी काळभोर – शिरुर- हवेली विधानसभा मतदारसंघाच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीतील मतदानावर पावसामुळे परिणाम होण्याची शक्‍यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून हवेलीच्या पूर्व भागात संततधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस उद्याही असाच बरसत राहिल्यास मतदानाची टक्‍केवारी घटण्याची दाट शक्‍यता जाणकारांनी व्यक्‍त केली आहे. उद्या पाऊस पडण्याची शक्‍यता वेधशाळेने व्यक्‍त केली आहे.

विधानसभेची निवडणूक सर्व 288 मतदारसंघात एकाचदिवशी सोमवारी (दि. 21) होणार आहे. या निवडणुकीत सामना होणार आहे. शिरुर- हवेली विधानसभा मतदारसंघात दिग्गजांमध्ये जोरदार लढत होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या काही दिवसांत मातब्बर नेते तसेच कार्यकर्त्यांकडून आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला आहे. या झंझावाती प्रचाराची सांगता शनिवारी (दि.19) संध्याकाळी झाली आहे. सोमवारी (दि.21) मतदान होणार आहे.
यंदा हवेलीच्या पूर्व भागावर वरुणराजा चांगलाच प्रसन्न झाला आहे. जुन, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या पावसाळ्याच्या चारही महिन्यांत दमदार पाऊस झाला आहे.

ऑक्‍टोबर महिना संपत आला तरी पाऊस सुरूच आहे. गेल्या महिन्यातील जोरदार पावसाने ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी नागरिकांच्या घरातही पाणी शिरले होते, काही ठिकाणी ओढ्या, नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे नागरिकांचा गावांशी संपर्क तुटला होता.

शुक्रवारी (दि.18) मध्यरात्रीपासून हवेलीच्या पूर्व भागात संततधार, रिमझिम पाऊस सुरू आहे. हा सुरु झालेला पाऊस थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. हा पाऊस सुरूच राहिला तर मतदानाची टक्‍केवारी कमी होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे स्थानिक नेते गॅसवर राहिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.