सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस
पुणे – पुणे शहरासह राज्यात सर्वत्र मान्सून आता सक्रिय झाल्याने पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. पुण्यात गेल्या 24 तासांत 30 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
पुणे शहरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार कोसळत आहे. आज सकाळी पावसाच्या काही सरी कोसळल्या. त्यानंतर दुपारी पावसाने थोडी विश्रांती घेतली तर संध्याकाळी पुन्हा जोरदार सरी कोसळल्या. गेल्या 24 तासांत म्हणजे गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुणे शहरात 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर गुरुवारी संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यत 21 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला आहे.
मान्सूनचा प्रवाह वाढल्याने अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत, त्याचबरोबर उत्तर कोकण आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती झारखंडपर्यत असल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात पावसाचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे गेल्या 24 तासांत तब्बल 190 मिलीमीटर पाऊस पडला आहे. देवरूख येथे 110 मिलीमीटर तर श्रीवर्धन येथे 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूर येथे तीन दिवसांपासून सुरू असणारा पावसाचा जोर कायम होता.