बीड – माजलगाव येथील कुणाल कापूस जिनिंगला आज भीषण आग लागली. या आगीत जिनिंगच्या आवारात साठवून ठेवलेला 15 हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जिनिंगमध्ये असलेल्या मशीनमध्ये स्पार्किंग होऊन ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
बीडच्या माजलगाव शहराजवळ असलेल्या फुले पिंपळगाव येथील कुणाल जिंनिगला आज दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या आगीने लागलीच रौद्ररूप घेतले.
यामुळे जिनिंगमधील कापूस व कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत. त्याचबरोबर जिनिंग मधील साहित्य देखील जाळून खाक झाले आहे. सुदैवाने जीवित हानी टळली आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
जिनींगला आग लागताच धावपळ सुरु झाली. जिनिंगमध्ये असलेल्या काहींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र कापूस असल्याने आगीने रौद्ररूप धारण केला. याबाबतची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली.
अग्निशमन बंब येथे दाखल झाले असून याच्या माध्यमातून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली. तसेच आगीत झालेल्या नुकसानीचा आकडा किती आहे? हे अद्याप अस्पष्ट झालेले नाही.