साठी ओलांडल्यानंतरही ग्लॅमरस नि तंदुरुस्त आजी-आजोबा होऊ शकता

मधुमेह, हृदयरोग, उच्चरक्तदाब, सांधेदुखी यांसारख्या शारीरिक व्याधी वयाची साठी ओलांडल्यावर डोकं वर काढतात, पण सकारात्मक इच्छाशक्ती असेल तर याही आजारांवर मात करता येते. आता काय आम्ही करणार, आमची साठी झाली, जोपर्यंत शरीर साथ देतंय तोपर्यंत कसंबसं जगायचं..’ अशी साठी ओलांडलेल्या कित्येकांची तक्रार असते.

तब्येतीच्या कुरबुरी करतच आपल्या नातवंडांना सांभाळण्यात ते धन्यता मानतात. मात्र, आता आपण थकलोय, असं सांगत रडत-खडत खुर्चीवर बसण्यापेक्षा या वयातही तुम्ही ग्लॅमरस नि तंदुरुस्त आजी-आजोबा होऊ शकतात. त्यासाठी काही गोष्टींचं पालन करायला हवं.

चयापचय क्रिया :
आपल्याला खूप घाम आला म्हणजे आपल्या शरीरातील ऊर्जा (कॅलरीज) वापरली गेली, असा काहीसा समज असतो. मात्र, ही गोष्ट काही खरी नाही. कारण आपली चयापचय क्रिया सातत्याने म्हणजे आपण काहीही न करता बसलेलो असतो, तेव्हाही सुरूच असते. चयापचय म्हणजे आपल्या शरीराचं कार्य संतुलित ठेवण्यासाठी ठरावीक ऊर्जेचं उष्मांकात रूपांतर होणं. म्हणूनच म्हातारपणाकडे झुकताना काही गोष्टीची काळजी घेणं आवश्‍यक आहे.

उपाशी राहू नका :
या वयात उपासतापास करणं टाळावं. दोन तासांपेक्षा जास्त वेळ काहीही न खाणं ही गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाही. जास्त वेळ पोट रिकामी ठेवल्यास रक्तातील शर्करेचं प्रमाण वाढतं. साखरेचं हे वाढीव प्रमाण मधुमेहाला आयतंच निमंत्रण देतं. एका वेळी भरपूर खाण्यापेक्षा दीड-दोन तासांच्या अंतराने थोडं थोडं खावं. पोषणमूल्यांनी परिपूर्ण असलेले पदार्थाचा समावेश आहारात असावा. यामुळे चयापचय क्रिया सुरळीत सुरू राहील. उपासही घडणार नाही.

खात खात पुस्तक वाचू नका :
वाचनाची सवय चांगली असते. मात्र, जेवताना पुस्तक वाचणं ही गोष्ट अयोग्य. कारण तुमचं खाण्याकडे लक्षच नसतं सगळं लक्ष त्या पुस्तकातच असतं. त्यामुळे कधी कधी पोट भरलेलं असतानाही सतत खात राहतो.

सतत आणि वेळी-अवेळी खात राहिल्याने तुमच्या चयापचय क्रियेवर त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता असते. सावकाश खावं. प्रत्येक घास चावून खा. गिळू नका. वाचत असाल तर मध्ये थांबून पोटं भरलं आहे की नाही, याचा अंदाज घ्यावा.

भरपूर पाणी प्या :
अचानक पोटात भुकेने कावळे ओरडतात तेव्हा किती खाऊ आणि काय खाऊ, असं होतं. याचा अर्थ प्रत्येक वेळेला भूक लागल्यावर काही खाल्लंच पाहिजे असं नाही. कारण कधी कधी भूक लागते, तेव्हा शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे भूक लागल्यासारखी वाटते.

अशा वेळी भरपूर ग्लास पाणी प्यावं. ज्या पदार्थात पाणी जास्त आहे, असे पदार्थ म्हणजे कलिंगड, संत्रं, अननस, टोमॅटो आणि काकडी यांसारखी रसदार फळं किंवा फळभाज्या खाव्यात. यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज वाढणार नाहीत. शिवाय तुमचं वजनही आटोक्‍यात राहील.

उच्चरक्तदाबावर नियंत्रण हवंच! :
कित्येकदा 35 टक्के माणसांना उच्चरक्तदाब आहे, याची जाणीव नसते. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष होतं आणि मग योग्य ती ट्रीटमेंट त्यांना मिळत नाही. अस्थिरता आणि उच्चरक्तदाब यात अनेकदा गल्लत होते. एका ठिकाणी काम करू न शकणाऱ्या अस्थिर मंडळींना उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, असं वाटतं. प्रत्यक्षात ते खरं नाही. हा गैरसमज आहे. कित्येकदा वर वर पाहता शांत दिसणाऱ्या मंडळींना उच्चरक्तदाबाचा त्रास असतो.

अनुवंशिकता :
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कधी कधी अनुवंशिकता किंवा जनुकांमध्ये काही बिघाड झाल्यास असा त्रास होण्याची शक्‍यता असते.

वाढतं वय :
भारतीय उपखंडातील लोकांना उच्चरक्तदाबाचा त्रास असतोच, असं गृहीतच धरलं जातं. वाढत्या वयाबरोबर हा त्रास अधिक जाणवायला लागतो. उदा. मेनोपॉजच्या आधी महिलांना हा त्रास कमी प्रमाणात जाणवतो. त्यावर त्या उत्तमरीत्या नियंत्रण ठेवू शकतात. मात्र मेनोपॉजनंतरच्या काळात उच्चरक्तदाबावर नियंत्रण ठेवू शकत नाही. याबाबतीत पुरुषांच्या तुलनेत त्या कमी पडतात.

जीवनपद्धती :
धूम्रपान आणि दारू तसंच चहा, कॉफी यांसारखे पदार्थ तसचं अतिखारट पदार्थ खाणं टाळावं. कारण हे पदार्थच हळूहळू उच्चरक्तदाबाकडे वळवत असतात. अतिस्थुलता, बैठं काम करण्याची पद्धती, ताण यासारख्या गोष्टी तुम्हाला उच्चरक्तदाबाकडे वळण्यास भाग पाडतात.

– डॉ. मानसी पाटील

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)