शिरूर -राज्य शासन आणि केंद्र सरकार याची महत्त्वाकांक्षी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेतंर्गत एकात्मिकपणे शिरूर येथील माऊली हॉस्पिटलमध्ये महिला आणि लहान मुले यांच्या आजारासाठी मोफत उपचार सुविधा कार्यान्वित केल्याची माहिती माऊली हॉस्पिटलचे डॉ. सतीश आंधळे यांनी दिली आहे.
योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड घेऊन रुग्णांनी गुजर मळा माऊली हॉस्पिटलमध्ये यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिरूर, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यांतील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
योजनेतंर्गत माऊली हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग, प्रसूती आणि बालरोग विभागामध्ये गरजू, गरीब कुटुंबाना पूर्णपणे मोफत उपचार मिळणार आहेत. नैसर्गिक प्रसूती, सिझेरियन प्रसूती, जोखमीची प्रसूती, गर्भपिशवी आणि अंडाशयाशी निगडित सर्व आजारांवरील उपचार आणि ऑपरेशन्स हे मोफत केले जाणार आहेत.
नवजात अर्भक अतिदक्षता विभागात लहान मुलांच्या सर्व आजारांवर मोफत उपचार होणार आहेत. या ठिकाणी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून तसेच स्त्रीभ्रूण हत्त्या थांबव्यात म्हणून माऊली हॉस्पिटलमध्ये (दि.12) जून 2016 पासून मुलगी वाचावा अभियान सुरू आहे. आजतागायत 300 हून अधिक नैसर्गिक प्रसूती आणि सिझेरियन प्रसूती मोफत करण्यात आल्या आहेत.