नगर -लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असलेले सर्वसामान्य कामगार, आर्थिक दुर्बल घटक व शहरात अडकलेले परप्रांतीय मजूर आणि विद्यार्थ्यांना जेवण पुरविणाऱ्या महापालिका कम्युनिटी किचनच्या सहकाऱ्यांची सेवाप्रीतच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमीयोपैथी गोळ्याचे वाटप करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील महिलांचा ग्रुप विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात सेवाप्रीतच्या वतीने घर-घर लंगरसेवा व लालटाकी सेवा मंडळला अन्न-धान्याची मदत करण्यात आली होती. तर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शहरातील भुकेलेल्यांसाठी आधार बनलेले महापालिका कम्युनिटी किचनच्या सहकाऱ्यांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
हॉटेल संजोग येथे महापालिका कम्युनिटी किचनच्या माध्यमातून गरजूंना जेवणाचे डबे पोहचविण्याची सेवा देणाऱ्या सदस्यांसह, मनपाचे अधिकारी, कर्मचारी व जेवण बनविणारे आचारी यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी करण्यात आली.
प्रकल्प प्रमुख डॉ.सिमरन वधवा यांनी सर्व सहकाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यासाठी डॉ.बिंदू शिरसाठ, सतीश उंडे, कविता सिस्टर यांनी सहकार्य केले. डॉ.जसपालसिंग नारंग यांनी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमियोपैथीच्या गोळ्या मोफत उपलब्ध करुन मार्गदर्शन केले. यावेळी ग्रुपच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, मनपा पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम, सातपुते, पैठणकर, प्रदीप पंजाबी उपस्थित होते.
गरजूं पर्यंत करोनाच्या संकटकाळात स्वत:ची व कुटुंबाची पर्वा न करता काही महिन्यांपासून जेवणाचे पाकिट पुरविण्याचे कार्य सुरु आहे. शहरातील प्रत्येक भागात जाऊन हे वाटप सुरु आहे. वाटप करणाऱ्या सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे डॉ.सिमरन वधवा यांनी सांगितले. परिमल निकम यांनी महिलांनी या संकटकाळात घेतलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.