श्रीगोंदा (शहर प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावापासून काही अंतरावर असणार्या माळरानावर काही कुत्र्यांनी उकरून एक शीर नसलेला मृतदेह बाहेर काढला. ही बाब आजूबाजूला राहात रहिवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क करून या प्रकाराची माहिती दिली. हा प्रकार सोमवारी (दि.8) सायंकाळी उघडकीस आला. दरम्यान, खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह पुरला असण्याची प्राथमिक शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, टाकळी कडेवळीत गावापासून काही अंतरावर असणार्या माळरानावर शीर नसलेल्या पुरुषाचा मृतदेह कुत्र्यांनी उकरून काढला. दरम्यान, दुर्गंधी येत असल्याने स्थानिक रहिवासी तेथे गेले असता, त्यांना मृतदेह आढळून आला.
त्यानंतर त्यांनी याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच तहीसलदार प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, डॉ. संघर्षशील राजुळे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अर्धवट पुरलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला.
हा मृतदेह पुरुषाचा असून, त्याचे शीर घटनास्थळी आढळून आले नाही. मृताची शरीरयष्टी मजबूत असून, अंगात निळ्या रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट आहे. मृतदेहाचे धड घटनास्थळी आढळून आले नसल्याने हा खुनाचाच प्रकार असण्याची शक्यता पोलीस यंत्रणेकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येणार आहे.