पिंपरी- करोनाची रुग्णसंख्या घटल्याने पीएमपीने बहुतांशी मार्गावरील बसफेऱ्या पूर्ववत केल्या आहेत. मात्र, करोनाचा प्रादूर्भाव होऊ नये, याकरिता बसमध्ये उपलब्ध करुन दिलेल्या सॅनिटायजरकडे प्रवाशांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने, 23 मार्च 2020 पासून केंद्र सरकारने देश लॉकडाऊन केला. त्यादिवशी दुपारपासूनच पीएमपीएमएल बससेवा बंद करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक व खासगी वाहतुकीवर बंदी घालत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सुरु ठेवंण्यात आली होती. तर अतिरिक्त चालक व वाहकांची नेमणूक बीआरटी थांब्यांबर करण्यात आली होती. अनेकांना महापालिका सेवेत पाठविण्यात आले होते.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यापासून पीएमपीएमएलने मर्यादित स्वरुपात बसफेऱ्या सुरु केल्या. मात्र, तरीदेखील प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र होते. त्यानंतर आता पीएमपीने एकूण बसपैकी 80 टक्के बस रस्त्यावर उतरविल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासादरम्यान अनेक प्रवासी एकत्र येत असल्याने, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व बसमध्ये पीएमपीएमएलच्या वतीने सॅनिटायजरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांकडून सॅनिटायजरकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.
सॅनिटायजर घेतल्यास शंकास्पद नजरा
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बसमधील सॅनिटायजरचा वापर बहुतांशी प्रवाशांकडून होत नाही. मात्र, काही जागरुक प्रवाशांकडून बसमध्ये प्रवेश केल्यानंतर हातावर सॅनिटायजर घेतले जाते. अशा प्रवाशांकडे अन्य प्रवासी शंकास्पद नजरेने पाहत असल्याचे चित्र बसमध्ये पहायला मिळत आहे.