थेऊर – हवेली तहसील कार्यालयात करोनाचा शिरकाव झाला आहे. येथील एका अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्या संपर्कातील महसूल, खासगी सहायक व संगणक चालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करुन घेतले आहे. त्यामुळे हवेली महसूल प्रशासनाचे काम काही प्रमाणात मंदावले आहे. मात्र करोना रोखण्यासाठी हवेली तहसीलमधील प्रशासन उपाययोजनेबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
हवेली तहसील कार्यालयातील तिघांना करोना झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी व शासकीय कर्मचाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. तहसील कार्यालयात करोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव आढळून येत आहे. हवेली तहसील कार्यालयाच्या ईमारतीलगतच नगर भूमापन अधिकारी कार्यालय, सह दुय्यम निबंधक कार्यालय व पुणे शहर तहसील कार्यालय एकाच ठिकाणी असल्याने करोनाचा फैलाव वेगाने होण्याची शक्यता आहे. मात्र येथे येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता, प्रशासन करत असलेल्या करोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबतचे प्रयत्न येथे तोकडे असल्याचे दिसून येत आहे.
हवेली तहसील कार्यालयात नागरिक खातेदार शेतकऱ्यांची कामानिमित्त मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू आहे. मात्र बहुतांशी नागरिक मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने सर्वांनी मास्क वापरावे, सुरक्षित सोशल डिस्टंन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावे व विनाकारण कोणीही गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहे. – संजय भोसले, नायब तहसीलदार, हवेली.