नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या मुसक्या आवळण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस दलास अखेर यश आले आहे. आज पहाटे हैद्राबाद येथून त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
तेथून एक पथक त्यास घेऊन नगरकडे निघाले आहे. आज दुपारनंतर त्यास पारनेर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, त्या संदर्भात आज सकाळी माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद बोलाविली आहे.
रेखा जरे पाटील यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्याच्या हद्दीतील जातेगाव घाटात दोघा जणांनी गळा चिरून हत्या केली होती. त्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत छडा लावग अत्यल्प काळात यातील पाच संशयित आरोपींना जेरबंद केले. त्यातील संशयित आरोपी सागर भिंगारदिवे यास ताब्यात घेतल्यानंतर जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे तपासात समोर आले. तथापि, तेव्हापासून बोठे पसार होता.
पाच पोलीस पथके त्याच्या मागावर होती. तथापि, प्रत्येकवेळी पोलीस पथकास चकवा देण्यात बोठे यशस्वी होत होता. अखेर आज त्याला हैद्राबाद येथून अटक झाली. दोन दिवसांपूर्वी रेखा जरे पाटील यांच्या खून प्रकरणात सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्यासाठी ख्यातनाम वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांनी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे तीन महिन्यांपासून सापडत नसल्याने, अखेर त्यास फरार घोषित करण्यात आलेले आहे. तत्पूर्वी बोठेला पकडण्यासाठी न्यायालयाने पोलिसांच्या अर्जावरुन स्टँडींग वॉरंट देखील मंजूर करुन घेतलेले आहे. फरार घोषित करण्यापूर्वी बोठे यास पोलिसांत हजर होण्यासाठी येत्या 9 एप्रिलचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. 9 एप्रिलपूर्वी तो हजर न झाल्यास मालमत्ता जप्तीसारखी पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिलेला होता.
पैसे संपले अन् घोळ झाला…!
बोठे याच्याकडील खर्चासाठीचे पैसे संपल्याने त्याने नगरमधील एका मित्राला फोन करुन एका बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. मात्र, ज्या मोबाईलवरुन बोठे याने संपर्क केला, तो मोबाईल नंबर अगोदरच पोलीसांना मिळालेला होता. तथापि, तो मोबाईल नंबर बंद असल्याने पोलीस तपास थांबलेला होता. पैशांसाठी बोठे याने फोन चालू केला अन् घोळ झाला. फोन होताक्षणी पोलीस पथक पुन्हा अलर्ट झाले, अन् मिळालेल्या लोकेशनच्या आधारे बोठे लपून बसलेल्या ठिकाणी त्यांनी त्वरेने छापा घातला. त्यात बोठे अलगद पोलीसांच्या तावडीत सापडला.