हरियाणा विधानसभा : कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रचार सभा रद्द

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका एकाच दिवशी पार पडणार आहेत. या दोन्ही ठिकाणांच्या प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, असे असताना हरियाणामध्ये कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रचार सभा रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.


कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी गुरुवारी संध्याकाळी अचानक आजारी पडल्यामुळे त्यांची शुक्रवारी हरियाणातील महेंद्रगढमध्ये होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी राहुल गांधी आता या ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने याविषयी एका इंग्रजी वर्तमानपत्राला माहिती दिली.

कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर होत असलेली सोनिया गांधी यांची ही पहिलीच प्रचारसभा होती. पण तीही रद्द करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात सोनिया गांधी यांची पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

हरियाणातील महेंद्रगढमध्ये दुपारी दोन वाजता राहुल गांधी यांची प्रचारसभा होईल. सोनिया गांधी काही अपरिहार्य कारणामुळे सभा घेऊ शकणार नाहीत, असे ट्विट हरियाणा कॉंग्रेसच्या ट्विटर हॅंडलवरून करण्यात आले होते. पण काही वेळातच हे ट्विट काढून टाकण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.