वेल्हे, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतंत्र नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस, असे चिन्ह काही दिवसांपूर्वीच मिळाले. पक्ष विस्ताराचे दृष्टीने मोठा गाजावाजा करून हे चिन्ह किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करून पक्षाने ते लोकांपर्यंत पहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचा फायदा पक्षाला किती होतो हा विषय बाजूला ठेवला तर, परिसरातील तुतारीवादकांना मात्र, याचा लाभ नक्कीच झाल्याचे चित्र दिसत आहे.
या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना याचा सर्वाधिक लाभ गाव खेड्यांमध्ये तुतारी वाजवणाऱ्या लोकांना होत असून त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. गावागावांमध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमांना तुतारी वाजवणाऱ्यांना निमंत्रित करण्यात येत आहे. यातून त्यांना चांगले मानधन मिळत असल्याचे काही कलांवंतांनी सांगितले.
तुतारी वाजविणारा एक व्यक्ती एक ते दोन हजार रुपये एका कार्यक्रमाचे घेत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला आपले चिन्ह तुतारी हे जनसामान्यांपर्यंत पाहोचावयाचे आहे. यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून चिन्ह पोहचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छोट्या मोठ्या कार्यक्रमांना तुतारी वाजविणाऱ्यांना निमंत्रित करण्यात येत आहे.
शिवकालापासून तुतारी या वाद्याला आपल्याकडे खूप महत्व आहे. विजयाचे स्वागत तुतारी वाजऊन केले जायचे. अनेक पिढ्या ही कला जिवंत राहिली. मात्र, आधुनिक युगात ती लोप पावत चालतानाच डिजे संस्कृती उदयास आली. मध्यंतरी डीजे बंदी झाली तेव्हा वाजंत्री ताफ्याबरोबर ही तुतारी पुन्हा वाजू लागली. मात्र, पुन्हा एकदा डिजेने डोके वर काढले आणि या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असताना राज्यातील या राजकीय घडामोडींनी या कलेला पुन्हा एकदा गत वैभव प्राप्त झाले आहे.
राजकीय घडामोडी काय झाल्या कशा झाल्या याचा आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर कोणताही फरक पडत नाही. आमची ही वाजंत्री कला लोप पावत असताना. या राजकीय घडामोडीमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हामुळे आम्हाला १००% रोजगार निर्माण झाला आहे. मतदारांना सांगावे लागत नाही चिन्ह कोणते आणि मतदान करायचे कोणाला ते त्यांना सर्व आवगत असते असे अनेक कलाकार सांगतात.
राजकीय गणित सर्वत्र काय चालू आहेत याच्याशी आमचा फारसा संबंध येत नाही. हातावर पोट असलेला हा आमचा व्यवसाय जेव्हा कधी वाजंत्रीसाठी बोलावले जाईल तेव्हा चार पैसे हाताला मिळतील. प्रामुख्याने लग्नसराईमध्ये आम्हाला मागणी असते. परंतु या राजकीय घडामोडींमध्ये लागलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यामुळे आमच्या व्यवसायात वाढ झाली आहे. – बाळासाहेब आल्हाट, सदस्य, वाजंत्री पथक,गुंजवणे