पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्यात १४ हजार ६४८ नवीन नोटरींची नियुक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे, ॲड. सय्यद सिकंदर अली, ॲड. रामराजे भोसले, ॲड. विनयकुमार दुबे व पदाधिकारी यांनी कायदा मंत्री, भारत सरकार अर्जुन राम मेघवाल यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील नोटरी यांची संख्या वाढवून लवकर यादी जाहीर करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्यासाठी केंद्रीय नोटरी म्हणून नियुक्तीसाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत ज्या अर्जदारांचे अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले होते, त्यांच्या मुलाखती १७ मार्च २०२३ व ४ मे २०२३ या कालावधीत ऑनलाइन घेण्यात आल्या. त्यानंतर १५ ते १७ मे २०२३ पर्यंत काही कारणास्तव गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना एक संधी देण्यात आली. प्रशासकीय अत्यावश्यकतेमुळे मुलाखतीचा दुसरा टप्पा ६ व ७ मार्च २०२४ रोजी झाला.
त्यानंतर नोटरी म्हणून तात्पुरती नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या अर्जदारांची नावे संलग्न यादीत आहेत, त्यांना आपली आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची लीगल सेलने विनंती केली आहे. संबंधित कागदपत्रे येत्या १५ एप्रिलपर्यंत जमा करणे आवश्यक आहे, अशी माहिती ॲड. लांडगे यांनी दिली.