रेडा -माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या इंदापूर दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघावर सहकारी संस्था दुग्ध पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी मंगळवार (दि. 16) रोजी थेट आदेश काढत दूधगंगा संघावर अवसायनाची अंतरीम कारवाई करत सहाय्यक निबंधक जे. पी. गावडे यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केलेल्या अमूल बरोबरच्या कराराचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी पुणे कार्यालयामार्फत विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध यांच्याकडून इंदापूर दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघावर अवसायनाचा अंतरिम आदेश पारित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून बंद असलेल्या व सध्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या दूधगंगा सहकारी दूध उत्पादन संघाच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 तसेच मंजूर उपविधी त्यांचे पालन करणे, इंदापूर दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे कर्तव्य असताना देखील केले नाही. या संदर्भात सन 2016 मध्ये पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले होते. त्या अपिलावर प्राप्त आदेशानुसार संघाविरुद्धचे अंतिम अवसायनाचे आदेश अटी शर्तीच्या अधीन राहून रद्द केले होते. परंतु इंदापूर दुधगंगा सहकारी दूध संघाने कोणत्याही अटींची पूर्तता केलेली नव्हती. त्यामुळे कारवाई होण्यासाठी संघ पात्र ठरला.
या दूधगंगा संघाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 462.73 लाख इतका निधी मंजूर झाला असतानाही.त्यापैकी 395.42 लाख एवढाच दूधगंगा संघाने वितरित केला आहे. तरीदेखील दूध संकलन बंद होते हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे दूधगंगा संघाला नोटिसा देण्यात आल्या होत्या. कारवाई संदर्भात खुलासावर लेखी म्हणणे 15 जून पर्यंत कालावधी देण्यात आला होता. परंतु दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांचे थकीत देणे देण्यासंदर्भात, तक्रारी अर्ज अनुसरून, त्या कामगारांची थकीत देणी, मिळाली आहेत किंवा इथून पुढे कोणतेही कामगारांची तक्रार नाही असे शपथपत्र किंवा ठोस पुरावे अद्याप दूधगंगा सहकारी संघ देऊ शकला नाही. त्यामुळे दूधगंगा संघावर कारवाई करण्यात आली. या आदेशाबद्दल स्पष्टीकरण एक महिन्याच्या आत देण्यात यावे, असे आदेश विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांनी काढले आहेत.
आम्ही या अवसायकाच्या आदेशाविरोधात न्याय मागितला असून, त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विरोधकांनी याचे राजकारण करू नये. इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असून, त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे.- मंगेश पाटील,
अध्यक्ष दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ इंदापूर.