वरवंड – पाटस (ता. दौंड) येथील पती-पत्नी डॉक्टरांचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पाटस परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन पाटस ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाटस मधील दोन डॉक्टर करोना पॉझिटिव्ह असल्याने आरोग्य विभाग आणि पाटस ग्रामपंचायतीच्या वतीने या दवाखान्यापासून 500 मीटर परिसर संपूर्णतः सील करण्यात आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे तपासणीसाठी नमुने घेण्याचे काम सुरू आहे.
तसेच आशा सेविकांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांचा सर्व्हे करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.