पिंपरी – “ऑडिओ रेकॉर्डिंग’मध्ये पैशांची वाटप 16 जणांमध्ये होत असलेबाबत उल्लेख झाला होता. त्या 16 व्यक्ती या स्थायी समितीच्या सदस्य असून, 16 जणांसह अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये रॅकेट आहे का? याबाबत चौकशी करावयाची असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (दि. 26) न्यायालयात केल्याने स्थायीचे 16 सदस्य रडारवर आले आहेत.
जाहिरातींचा व्यवसाय करणाऱ्या एका ठेकेदाराने स्थायी समितीमध्ये सुरू असलेल्या लाचखोरीबाबत पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर बुधवारी (दि. 18) या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करत स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे व त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे, संगणक चालक राजेंद्र शिंदे, लिपिक विजय चावरिया व शिपाई अरविंद कांबळे या पाच जणांना अटक केली होती. न्यायालयातील सुरुवातील पोलीस कोठडी सुनावल्यानंतर या पाचही जणांची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
यातील ऍड. नितीन लांडगे यांना 26 तारखेपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला होता. आज त्या जामीनावर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान लाचलुचत प्रतिबंधक विभागाने न्यायालयासमोर आपले लेखी म्हणणे मांडले आहे.
न्यायालयासमोर सादर केलेल्या अर्जामध्ये स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या तपासाबाबत उल्लेख केला आहे. लाच प्रकरण समोर आल्यानंतर लाचलुचत प्रतिबंधक विभाग 16 जणांच्या चौकशीवर ठाम असल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. न्यायालयात सादर केलेल्या अर्जावरील म्हणण्यानुसार चौकशी झाल्यास अनेकांच्या अडचणी वाढणार असून, अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लाचखोरीचे रॅकेट
एसीबीच्या हाती लागलेल्या “ऑडिओ क्लीप’मध्ये 16 जणांना लाचेची रक्कम वाटावी लागते, असा उल्लेख आलेला आहे. याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू होता. उल्लेख झालेले 16 व्यक्ती हे स्थायीचे सदस्यच असल्याचा दावा आज न्यायालयात करण्यात आला. हे 16 सदस्य, स्थायीचे अध्यक्ष आणि चार कर्मचाऱ्यांमध्ये लाचखोरीचे काही रॅकेट आहे का? याचा तपास करावयाचा असल्याचे “एसीबी’ने न्यायालयात म्हटल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
चौकशी झाल्यास सेना,
राष्ट्रवादीचेही पितळ उघडे पडणार
महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक, तर अपक्षांचा एक असे पक्षीय बलाबल आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 16 सदस्यांची चौकशी केल्यास महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.