काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ भाजपही देणार ‘तुपें’ च अध्यक्ष ?
पार्टीने अध्यक्ष रिपीट केल्यास मंडल अध्यक्ष म्हणून दळवींच्या नावाला पसंती
हडपसर ( विवेकानंद काटमोरे ) : भाजप शहर अध्यक्षपदी धीरज घाटे यांची निवड झाल्यानंतर पक्षातील सर्वच पदांवर तात्काळ नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात यायला हवी होती. मात्र, दिड महिना उलटल्यानंतरही शहरातील आठही विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती लांबणीवर पडल्याचे चित्र दिसत आहे.त्यात हडपसर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकतेच विधानसभा अध्यक्ष व इतर पदाधिकारी नियुक्ती करून बाजी मारली आहे. त्यामुळे भाजपचा मतदार संघातील नवा अध्यक्ष कोण असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली असून पक्षाच्या वर्तुळातही त्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस पक्षाने दिलीप शंकर तुपे यांची हडपसर विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) ने प्रविण सादबा तुपे यांची नियुक्ती केली आहे.त्यामुळे भाजपमध्ये इच्छुक असलेले भूषण तुपे यांचीही हडपसर विधानसभा अध्यक्ष पदी वर्णी लागली जावू शकते, अशीच चर्चा येथील राजकीय वर्तुळात आहे.तर पार्टीने रिपीट संधी देण्याचे ठरवले तर संदिप दळवी यांच्या नांवाला अनेकांनी पसंती दिल्याचेही बोलले जात आहे.
लवकरच हडपसर विधानसभा मतदार संघात भाजपला नवा अध्यक्ष मिळणार आहे. यासाठी अनेकांनी आपली भूमिका पक्ष निरीक्षकांकडे स्पष्ट केली आहे. त्यामुळे या पदासाठी मोठी चुरस आहे. यामध्ये प्रामुख्याने भूषण तुपे, संदीप दळवी, सुभाष जंगले, गणेश घुले , संदिप लोणकर ,जीवन जाधव, शिवराज घुले, शैलेंद्र बेल्हेकर, अमित गायकवाड यांच्यापैकी एकाची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदाच्या निवडीला विशेष महत्व आले आहे. अध्यक्ष संदीप दळवी यांची मुदत संपली आहे. त्यामुळे नवीन अध्यपदाच्या नियुक्तीबाबत काही दिवसांपासून चर्चा सुरु झाली आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी हडपसर- मांजरी बुद्रुक येथे पक्षाचे निरीक्षक माजी खासदार अमर साबळे आले होते. त्यावेळी हडपसर विधानसभा अध्यक्षसाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी आपले म्हणणे निरीक्षकांसमोर मांडले आहे. मतदार संघातील माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते त्यांनाही आपआपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली होती.
जसे शहर अध्यक्ष निवड करताना पक्षाने काही निकष लावले होते. तसेक्च निकष मंडल अध्यक्ष नियुक्त करताना असू शकतात.मतदार संघातील बदल घडवून आणण्यासाठी पूर्णवेळ देऊ शकेल, अशी व्यक्ती पक्षाला अध्यक्षपदासाठी अभिप्रेरित आहे. त्यामुळे या पक्षाच्या विधानसभा अध्यक्ष पदाला विशेष महत्व आहे. पुढील काळात लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजपची कसोटी लागणार आहे. त्यामुळे मतदार संघाच्या अध्यक्ष पदावर काम करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्या दृष्टीने या पदावर कोणाला संधी मिळणार याकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.दरम्यान याबाबत शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
पूर्व व पश्चिम असे दोन अध्यक्ष नियुक्तीची शक्यता!
शहरात हडपसर विधानसभा मतदार संघ हा सुमारे साडे चारशे पेक्षा अधिक याद्या असलेला आहे.त्यामुळे येथे पूर्व ( हडपसर) भागात एक आणि पश्चिम (कोंढवा ) भागाला एक असे दोन विधानसभा ( मंडल) अध्यक्ष नियुक्त केले जाणार अशी चर्चा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून यंत्रणा लावण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः हडपसर म्हणजे पूर्व भागाच्या पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबतची उत्सुकता आहे.
मंडल अध्यक्ष पदावर ‘भूषण तुपें’ चीच वर्णी लागणार?
पार्टीने जबाबदारी दिल्यास आपण ती पार पाडू अशी भावना प्रत्येक इच्छुक व्यक्त करत आहेत.अशीच भावना भूषण तुपे यांची असल्याचे समजते विद्यार्थी परिषद तसेच युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष, ग्रामीण आघाडी अध्यक्ष , शहर उपाध्यक्ष या संघटनात्मक तर, ग्रामपंचायत सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, सभापती या पदांवर भूषण तुपे यांनी काम केले असून यामाध्यमातून मागील ३५ वर्षं भाजपमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.कदाचित यामुळे भूषण तुपे यांची मंडल अध्यक्ष म्हणून वर्णी लागेल, अशी चर्चा सुरू आहे.