महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकरमध्ये भाविकांची मांदियाळी
भीमाशंकर/डिंभे – महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, दंकिनी, शाकिनी नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिवलिंगाचे भीमाशंकर (ता. आंबेगाव) येथे महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी भक्तिमय वातावरणात दर्शन घेतले. यावेळी “जंगलवस्ती भीमाशंकरमहाराज की जय, भोलेबाबा की जय’ अशा शिवघोषांनी येथील वातावरण दणाणून गेले होते.
सलग सुट्यांमुळे पर्यटकही वाढले
बुधवारी शिवजंयती आणि पुढे सलग सलग सुट्यांमुळे भाविकांचा ओघ भीमाशंकरला वाढला होता. दुपारनंतर मोठी गर्दी झाली. भीमाशंकर परिसर हा समुद्रसपाटीपासून 4 हजार फूट उंच डोंगरावर अूसन, थंड हवेचे ठिकाण आहे. पवित्र शिवलिंग, येथील अभयारण्यातील हनुमान तळे, कोकणकडे, गोरक्षनाथ मंदिर, देवीच्या शक्तीपीठापैकी असणाऱ्या कमलजादेवी मंदिर, शनी मदिर हे प्राचीन मंदिरे असून हुतात्मा बाबू गेणू सागर (डिंभे धरण) वेडीवाकडी नागमोडी वळणे निर्सगाचा खजिना येथील जंगलात विविध पक्षी, प्राणी मानचिन्ह असलेला शेखरुही खवल्या मांजर, वानरे, जंगली डुकरे, सांबर, भेकर, रानमांजर, उद, सायळ, मोर, आदी पक्षी-प्राणी येथे आल्यानंतर सहज दृष्टीस पडतात. थंडगार परिसर असल्यामुळे भाविकांनी पर्यटनाचाही आनंद घेतला.
श्री क्षेत्र भीमाशंकरला महाशिवरात्रीला सलग तीन दिवस सुट्या आल्याने भाविक-पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. यात्रेनिमित्ताने मंदिरात विशेष फुलांची सजावट केली होती. रात्री 12 नंतर कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, किरणताई वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद सहपत्नीक, उपविभागीय अधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंम्पे, देवस्थान अध्यक्ष सुरेश कैदरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
सुमारे अडीच लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. यात्रेदरम्यान आमदार दिलीप मोहिते, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, आंबेगाव पंचायत सभापती संजय गवारी, सदस्य इंदुताई लोहकरे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंढे पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आदी मान्यवरांनी शिवलिंगाचे
दर्शन घेतले.
200 पोलिसांचे पथक
महाशिवरात्रीत बॉम्बशोधक पथक, सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनबारीत यात्रेकरूंची तपासणी, मंदिराजवळ व पायऱ्यांच्या सुरुवातीला वॉच टॉवर, डॉग स्कॉड, हॅंडमेटल डिडेक्टर अशी विविध अत्याधुनिक यंत्रणा व मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस अधिकारी 20 आणि पोलीस कर्मचारी 180, असे एकूण 200 पोलीस कर्मचारी उपस्थित होते. ब्रिथ ऍनालायझरव्दारे मद्यप्राशन तपासणीसाठी वेगळे पथक तैनात केले होते.