अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना हनुमान चालीसा प्रकरणी कोर्टाने फटकारल्यानंतर न्यायालयात आज हजर राहणार आहेत. राणा दाम्पत्य हे आज मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हट्टाने हनुमान चालीसा पठण करण्याप्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी सलग दोन वेळा राणा दाम्पत्य न्यायालयात गैरहजर राहिले होते. मागील वेळी न्यायालायने त्यांना फटकारल्यामुळे आजच्या सुनावणीला राणा दाम्पत्य हजर राहणार आहे.
मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी मागील सुनावणीत खासदार नवनीत आणि त्यांचे आमदार रवी राणा गैरहजर होते. याची न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गंभीर दखल घेतली होती. लोकसभा अधिवेशनामुळे नवनीत यांची गैरहजेरी समजू शकतो पण रवी राणा गैरहजर का? असा सवाल न्यायालायने उपस्थित केला होता.
मागील सुनावणीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंटही गैरहजर होते तर सरकारी वकील सुमेर पंजवानीही गैरहजर होते. तसेच तपासाधिकारी सिक लिव्हवर असल्याची माहिती समोर आली. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आज संबंधित सर्वांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, न्यायालयाने फटकारल्यानंतर राणा दाम्पत्यानी सावध भूमिका घेत आज न्यायालयात हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे.