नगरपालिका, तहसीलदारांची पोलीस बंदोबस्तात कारवाई
सासवड (प्रतिनिधी) – सासवड पोलीस ठाण्याजवळील अतिक्रमणांवर सासवड नगरपालिका व प्रशासनाने संयुक्त कारवाई केली आहे. याबाबत दै. प्रभातने वृत्त प्रसिद्ध केले होते. नगरपालिका प्रशासनाने व तहसीलदारांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तात सासवड शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. 6 डिसेंबर पर्यंत सासवड शहरातील सर्व अतिक्रमणे हटविण्यात येणार असून यामध्ये कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नसल्याचे सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी स्पष्ट केले आहे.
आज सासवड शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील नव्याने उभी केलेली एक टपरी जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली. तहसीलदारांच्या निवासस्थाना समोरील अतिक्रमणे, सासवडच्या फळबाजारा समोरील टप-यांसह, पीएमटी बस स्टॉप समोरील पुणे पंढरपूर महामार्ग लगत अधिकृतपणे टपऱ्या व हॉटेलांची रस्त्यावर आलेली पत्र्याचे शेड काढण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे सासवड शहरातील सासवड-कोंढवा रस्त्यानजीकची दत्तनगर परिसरातील अतिक्रमणे देखील काढण्यात आली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हा के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कारवाईत एकूण 32 अतिक्रमणे काढण्यात आली. यामध्ये टपऱ्या दुकाने जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आली असून अशाच प्रकारे पुढील तीन दिवस सहा डिसेंबर पर्यंत कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आज सासवड नगरपालिकेच्या वतीने शहरात गाडी फिरवून ध्वनिक्षेपकका द्वारे अतिक्रमण करणारऱ्यांना आव्हान करण्यात आले आहे, की लवकरात लवकर त्यांनी अतिक्रमणे काढावीत; अन्यथा होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी अतिक्रमण करणारे जबाबदार राहणार असून याबाबत कोणतीही नुकसानभरपाई दिली जाणार नसून अतिक्रमणे काढताना हस्तक्षेप केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचेही पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. एकंदरीतच दैनिक प्रभातच्या बातमीचा इफेक्ट झाला असून अनेक दिवसांपासून अतिक्रमणांचा प्रश्न प्रलंबित होता दैनिक प्रभात ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले व अतिक्रमणांवर कारवाई करण्यास आज सकाळी सुरुवात झाली यासाठी मोठा पोलीस फौजफाटा बोलावण्यात आला होता तालुक्यातील इतर पोलिस ठाण्यातील कर्मचारी ही पाचारण करण्यात आले होते अतिक्रमणे काढताना बघ्यांची ही मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
“ती’ अतिक्रमणे हटविण्याची गरज
सासवड शहरातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्ग नजीक सासवडचे बस स्थानक असून या बस स्थानकाच्या समोर देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढत चालली असून सुरुवातीला एक ते दोन टपऱ्या होत्या मात्र आता सलग रोज एक नवीन टपरी याठिकाणी येत आहे काही हातगाड्या देखील उभे असतात त्यामुळे बसस्थानकातून एसटी महामार्गावर येताना अपघात होण्याची दाट शक्यता असून या दुकानांमुळे या परिसरात गर्दी झालेली असते महामार्गावरील वाहन वेगाने येत असतात त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून वाहतूक कोंडीचाही प्रश्न सतत भेडसावतो.नगरपालिकेने या अतिक्रमणांवर ही कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.