मंडल मिळवण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा नागरिकांचा आरोप
वासुंदे (वार्ताहर) – दौंड तालुक्यातील पाटस येथील महसूल विभागाच्या मंडलअधिकारी यांची नियुक्ती करीत असताना संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी सर्व शासन नियम ढाब्यावर बसवून नियुक्ती केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मे व जून महिन्यात तालुका महसूल विभागच्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले होते. यावेळी दौंड तालुक्यातील अनेक गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या; मात्र संबंधित महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या करीत असताना यापूर्वी केलेल्या सेवेचा कार्यकाळ व नियुक्ती केलेले ठिकाण यांचा विचार करून तलाठी व मंडलाधिकारी यांची नियुक्ती करणे गरजेच्या असताना शासन नियम पायदळी तुडवत महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात असल्याची चर्चा तालुक्यातील गावागावांत रंगत होती.
पाटस महसूल विभागात प्रामुख्याने कानगाव, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे, कुरकुंभ, कुसेगाव, पांढरेवाडी, बिरोबावाडी या गावांचा समावेश आहे. यामध्ये कानगाव, वासुंदे येथे खडी क्रशर, गौण खनिज उत्खननामध्ये आर्थिक हातमिळवणी केली जाते. कुरकुंभ येथे औद्योगिक क्षेत्र असल्याने अनेक महसूल विभागाचे कर्मचारी पाटस मंडल विभाग मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. असाच एक प्रकार पाटसच्या मंडळ अधिकारी यांची नियुक्ती करताना घडला आहे.
पाटस येथील मंडलाधिकारी यांची नियुक्ती करताना संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाचे सर्व नियम ढाब्यावर बसवून नियुक्ती केली आहे. नवनियुक्त मंडळ अधिकारी यांनी पाटसला तीन-तीन वर्षांचा दोन वेळा कार्यकाळ पूर्ण केला आहे. संबधित अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाने कारवाई केलेली असून याची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. संबंधित महसूल अधिकारी पाटसचे रहिवासी असल्याने स्थानिक ठिकाणीच अनेकवेळा नियुक्ती कशी केली जाते? या प्रश्नासंर्दभात सर्वसामान्य स्थानिक ग्रामस्थांना अनेक प्रश्न सतावत आहेत.
या प्रकरणाची जिल्हा अधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन पाटस येथील मंडल अधिकारी यांची नियुक्ती कोणत्या शासकीय नियमाने केली आहे, या बाबत सखोल चौकशी करून संबंधित मंडळ अधिकारी यांची भोर व वेल्हे तालुक्यात बदली करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. संबंधित मंडलाधिकारी नेहमीच मनमानी पद्धतीचा कारभार करत असून मला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात आहे, असाही गवगवा करीत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याची बदली होणार की, नियमबाह्य केलेल्या बदली व काय कारवाई होणार? हे पाहणे ग्रामस्थांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.
पाटस येथील मंडलाधिकारी यांची हंगामी नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित मंडलाधिकारी यांचा चौकशी अहवाल करण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना सांगून पुढील बदलीची प्रक्रिया केली जाईल.
– जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी
मी दौंड तहसील कार्यालयाचा कार्यभार स्वीकारण्याच्या आधी संबंधित मंडलाधिकारी यांची नियक्ती या ठिकाणी केली होती; मात्र, निवडणूक काळात संबंधित मंडलाधिकारी आजारपणाच्या रजेवर असल्यामुळे पाटस मंडल कार्यालयाचा पदभार हस्तांतरित करण्यात आला होता. संबंधित मंडलाधिकारी यांनी मागील पंधरा दिवसांपासून पदभार घेतला आहे. माहिती घेतली जाईल.
– संजय पाटील, तहसीलदार, दौंड.