तेल अविब : इस्त्रायल आणि हमास दहशतवादी संघटना यांच्यामधील लष्करी संघर्ष सुरू होऊन अनेक दिवस झाले असले तरी दररोज अनेक चित्र विचित्र गोष्टी समोर येत आहेत. हमास संघटनेचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या गाझा पट्टीवर जरी ताबा मिळवण्याचा प्रयत्न इस्त्रायलचे लष्कर करत असले तरी या गाजा पट्टीच्या प्रदेशात हमास संघटनेने उभारलेल्या भुयारांमुळे ह्या प्रदेशावर ताबा मिळवण्यामध्ये इस्त्राईलच्या लष्कराला धोका वाटत आहे.
40 किलोमीटर लांब आणि 10 किलोमीटर रुंद असलेल्या गाझापट्टीमध्ये 20 लाख पेक्षा जास्त पॅलेस्टनी नागरिक राहतात. वरून पाहिले तर गाजा पट्टी हे एखादे शहर आहे. एखाद्या विकसित शहराप्रमाणेच या या प्रदेशांमध्ये रुग्णालय शाळा आणि इतर सर्व संस्था दिसतात. पण हमास संघटनेने याच सगळ्या प्रदेशात खाली भुयारांचे मोठे नेटवर्क तयार केले आहे.
जमिनीवर असणाऱ्या शाळा रुग्णालय किंवा मशिदी या ठिकाणाहून या भुयारात जाण्याचा मार्ग तयार होतो. माहितीनुसार, गाजा पट्टीतील जमिनीखाली जे भुयारांचे नेटवर्क हमास संघटनेने उभारले आहे त्याची लांबी किमान 500 किलोमीटर आहे. गाझापट्टीत जमिनीखाली उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचाच वापर करून इस्त्राईलच्या सीमेत प्रवेश करून हमास संघटनेने 7 ऑक्टोबरला हल्ला केला असावा अशी एक शंका व्यक्त होत आहे.
जमिनीखाली उभारण्यात आलेल्या भुयारातून इस्त्राईलच्या सीमेवरही जमिनीखालून पोहोचणे शक्य आहे. 2001 मध्ये हमास संघटनेने गाझापट्टीमध्ये जमिनीखालील भुयारे खोदण्याचे काम सुरू केले होते. गेल्या 22 वर्षापासून ते काम सुरू असून आजही हे काम सुरूच आहे. 2001 मध्ये गाजा पट्टीवर इस्राईलचा ताबा होता, पण 2004 नंतर जेव्हा इस्त्राईलने हा ताबा सोडला त्यानंतर जमिनीखालील भुयारे उभारण्याचा वेग वाढला.
पहिल्या काही कालावधीमध्ये शस्त्रांची तस्करी करण्यासाठी भुयारी मार्गांचा वापर करण्यात येत होता . 2013 मध्ये इस्त्राईलच्या लष्कराला अशा एका भुयाराचा शोध लागला होता. ज्या भुयारामध्ये काँक्रीटचा वापर करून भुयाराची बांधणी करण्यात आली होती. पूर्ण गाझापट्टीमध्ये या भुयारी मार्गाचे नेटवर्क पसरले असल्याने हमास संघटनेच्या दहशतवाद्यांना जमिनीखालून कोठेही कोठे जाणे सहज शक्य होते. याची कल्पना इस्त्राईलच्या लष्कराला असल्यानेच गाझापट्टीवर प्रत्यक्ष ताबा मिळवण्यासाठी हल्ला करण्यापूर्वी लष्कराला हजार वेळा विचार करावा लागत आहे.