सांगली – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस आहे. त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक ठिकाणी सचिनचा वाढदिवस साजरा केला जात आहे. मात्र सांगलीतील औंढी गावात सचिनचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जात आहे. या गावातून चक्क सचिनच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक घरावर गुढी उभारण्यात आली आहे. अगदी नवं वर्षाप्रमाणे सचिनचा वाढदिवस येथे साजरा केला जात आहे.
औंढी गावात पालखीतून सचिनच्या प्रतिमेची भव्य रॅली काढण्यात आली आहे. यावेळी सर्वजण नवे कपडे घालून या भव्य रॅलीत सहभागी झाले आहेत. तसेच गावातील महिलांनी आपल्या दारात सुंदर रांगोळी काढली आहे. इतकेच नाही तर काही गावकऱ्यांनी घरासमोर गुढी उभारली आहे. ढोल-ताशांच्या गजरात दिंडी काढण्यात आली आहे. यावेळी घराघरात गोड पदार्थ देखील तयार करण्यात आले आहे.
Happy Birthday Sachin : वाढदिवसानिमीत्त गावात मोठी रॅली pic.twitter.com/WOpNx9rbKt
— Ruchika (@Ruchika66964659) April 24, 2023
या कार्यक्रमाला जेष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले हे देखील उपस्थित आहे. ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर काढण्यात आलेल्या ‘तेंडल्या’ चित्रपटाचे शूटिंग याच गावात झाले होते. त्यामुळे या गावाला सचिनबद्दल अधिक प्रेम आहे. सचिनने वयाचे अर्धशतक पूर्ण केल्याने असा आगळावेगळा वाढदिवस येथे साजरा करण्यात आला आहे. यावेळी गावात सचिनचे भलेमोठे पोस्टर देखील लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.