लाहोर – पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला एका प्रकरणात 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हाफिज सईद हा बंदी घातलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुखही आहे आणि तो मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मानला जातो. 3.40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यासोबतच त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. हाफिज सईदविरोधातील न्यायालयाचा हा आदेश अशा वेळी आला आहे जेव्हा पाकिस्तानमध्ये राजकीय संकट गडद होत चालले आहे. इम्रान खान यांची खुर्ची गेली, पण पुढे सार्वत्रिक निवडणुका होतील की विरोधी पक्षांच्या महाआघाडीतून शाहबाज शरीफ पंतप्रधान होतील, यावर अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हाफिज सईदने बांधलेले मदरसे आणि मशिदीही सरकारी नियंत्रणात ठेवण्यात येणार आहेत. दहशतवाद विरोधी न्यायालयाचे न्यायाधीश एजाज लोणी यांनी सांगितले की, सुनावणी पूर्ण होताच कठोर शिक्षेची घोषणा केली. पाकिस्तानच्या सीआयडीने हाफिज सईद आणि इतरांवर दहशतवाद आणि निधी पुरवल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले होते. याआधीही विशेष दहशतवादविरोधी न्यायालयाने सईदला अनेक प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावली आहे, मात्र तो बहुतांश वेळा त्याला उच्च न्यायालयांतून दिलासा मिळाला होता. यापूर्वी, 2020 मध्ये, हाफिज सईदला दहशतवादी फंडिंग प्रकरणात दहशतवादविरोधी न्यायालयाने 15 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 70 वर्षीय हाफिज सईदवर दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याप्रकरणी अनेक खटले सुरू आहेत.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये 26/11चे प्रकरण अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या घटनेला 14 वर्षे उलटूनही मुंबई हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी पूर्ण झालेली नाही. या प्रकरणी हाफिज सईद, झकी उर रहमान लख्वी यांसारख्या बड्या लष्कर कमांडरांवर कारवाई करण्यात पाकिस्तानला अपयश आले आहे. तर भारताने पाकिस्तानला अनेकवेळा मुंबई हल्ल्याप्रकरणी खटला लवकर चालवण्याची मागणी केली आहे.
मुंबई हल्ल्यात अमेरिका, इस्रायलसह अनेक देशांच्या नागरिकांसह 175 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मुंबई हल्ल्यादरम्यान प्रसिद्ध ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनलसह अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले. यामध्ये अजमल कसाब या दहशतवादीला जिवंत पकडण्यात आले. नंतर फाशीची शिक्षा देण्यात आली.