हडपसर(प्रतिनिधी) – हडपसर तुकाईटेकडी येथील पाण्याच्या टाकीत जाणाऱ्या पाण्याच्या लाईनला टॅप देऊन महंमदवाडी भागाला पाणी देण्यासाठी काम सुरू होते. काम करताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता महापालिका अधिकारी परस्पर काम करत होते. आज दुपारी रामटेकडी औद्योगिक वसाहत याठिकाणी तुकाईटेकडीच्या लाईनला ही नवीन लाईन जोडण्याचे काम सुरू होते. नागरिकांनी त्याला विरोध करत हे काम बंद करण्यास भाग पाडले.
हडपसर ,गाडीतळ, सातववाडी , गोंधळेनगर, काळेपडळ भागात असलेली पाणी समस्या सुटावी यासाठी तुकाईटेकडी येथे सन २०१२ मध्ये पाण्याची टाकी बांधून त्याला रामटेकडी ते तुकाईटेकडी अशी स्वतंत्र १८ इंच व्यासाची पाण्याची लाईन जोडलेली आहे.
याच लाईनला रामटेकडी औद्योगिक वसाहत येथे टॅप देऊन नवीन १८ इंची पाण्याची लाईन महंमदवाडी येथील पाण्याच्या टाकीत नेण्याची तयारी सुरु आहे. आज दुपारी त्यानुसार काम करण्यात येत होते.मात्र काही नागरिकांनी हे काम बंद पाडले. त्यामुळे जोड देण्यासाठी खोदलेला खड्डा पुन्हा बुजविण्यात आला आहे.
“हडपसर, गाडीतळ, सातववाडी , गोंधळेनगर, काळेपडळ भागाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी तुकाईटेकडी येथे पाण्याची टाकी उभारली आहे.त्यासाठी रामटेकडी ते तुकाईटेकडी अशी स्वतंत्र पाण्याची लाईन आहे.याच लाईनला जर जोड देऊन दुसरीकडे पाणी वळविल्यास येथील नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही. महंमदवाडी भागाला पाणी नेण्यास विरोध नाही. तर त्यासाठी रामटेकडीच्या टाकीतून स्वतंत्र पाण्याची लाईन टाकण्यात यावी.परंतु महापालिका प्रशासन त्रास कमी करण्यासाठी हा शॉर्टकट्स वापरत आहे.
– सुनिल बनकर(माजी नगरसेवक)
दरम्यान, याबाबत महापालिकेचे राजेश बनकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की तुकाईटेकडी वरील जाणाऱ्या या पाण्याच्या लाईनला व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्यात येणार होते. पाण्याचा कंट्रोल करण्यासाठी हा व्हॉल्व्ह बसविण्यात येणार होता. मात्र, काही नागरिकांनी या कामाला विरोध दर्शविला आहे.त्यामुळे काम बंद करण्यात आले आहे.