नागपूर – नागपूर येथील पारडी उड्डाणपुलाचा एक भाग कोसळण्यामागील कारणांची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक तज्ज्ञ-समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एक उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समिती या घटनेची चौकशी करेल, असे प्राधिकरणातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे पारडी फ्लायओव्हरचे काम मेसर्स गॅनन डंकरले अँड कंपनी लिमिटेड आणि मेसर्स एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड संयुक्तरित्या करत आहे. पूर्व नागपूरच्या या निर्माणाधीन पारडी उड्डाणपुलाच्या कळमना ते एचबी टाऊन या मार्गावरील एक भाग 19 ऑक्टोबरच्या रात्री 9 च्या सुमारास पडला. तथापि, या घटनेचे कारण कळाले नाही. मात्र, तज्ज्ञ तांत्रिक समितीच्या सविस्तर तपासणीशिवाय नेमके कारण कळणार नाही.
जानेवारी 2018 पासून आजपर्यंत या पुलाच्या कोणत्याही बिघाडीचे संकेत मिळाले नाही. उभारणीच्या वेळी सर्व चाचण्या प्राधिकरण अभियंतातर्फे घेतल्या असून, सध्या त्या ठिकाणी कोणतेही काम प्रगतिपथावर नव्हते. या घटनेत प्रवाशांना किंवा कामगारांना कोणतीही इजा अथवा हानी झाली नव्हती.