मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे नाव देशभर गाजत असल्याचं दिसून येत आहे. धीरेंद्र शास्त्री हे सतत चर्चेत असतात. कुणाच्याही मनातलं ओळखण्याची अनोखी सिद्धी या बाबांना अवगत असल्याची चर्चा आहे. त्यावरुन त्यांना अनेकांनी आव्हान देखील दिले आहे. आणि याच कारणांमुळे धीरेंद्र शास्त्री नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. धीरेंद्र शास्त्री यांना भेटण्यासाठी देशभरातून लोक येत असतात.
दरम्यान, आता पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांचे नाव चर्चेत आलं आहे. आणि त्याच कारण देखील तितकंच खास आहे. आपल्या कडे येणाऱ्या भाविकांचं मन वाचन करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्यावर आता सिनेमा येणार आहे. दिग्दर्शक अभय प्रताप सिंह यांनी याबद्दल घोषणा केली आहे.
सिनेमा विषयी बोलताना अभय प्रताप सिंह म्हणाले की, “बागेश्वर धाम’ या सिनेमात बागेश्वर धामचे धार्मिक महत्त्व तसेच मानवतावादी आणि सामाजिक कार्य यासर्व गोष्टींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या सिनेमाचं नाव नोंदणीकृत केलं आहे. एपीएस पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होणार आहे’.
तसेच, या महिन्यातच सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांची नावं बागेश्वर महाराजांची भूमिकेसाठी चर्चेत आहे. यापूर्वी ओटीटीवर प्रकाश झा यांच्या आश्रम मालिकेमध्ये अभिनेता ‘बॉबी देओल’नं साकारलेली बाबाजींची भूमिका प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय होती.
बॉबी देओलच्या ‘बाबाजी जाने मन की बात…’ या संवादाची बराचकाळ चर्चाही होती. त्यामुळे बागेश्वर महाराज यांच्या आयुष्यावर ज्या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे त्यामध्ये कदाचित बॉबी देओल मुख्य भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं आहे. ‘बागेश्वर धाम’ हा सिनेमा यावर्षातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.