- सर्वसामान्यांचा हिरमोड ः पालिकेने अनेक उद्यानात उपलब्ध करुन दिली आहे सुविधा
पिंपरी – गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील जिम दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. मात्र उद्यानात तसेच ठिकठिकाणी महापालिकेने उभारलेल्या ओपन जिम मात्र बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा चांगलाच हिरमोड झालेला आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा व्यायामशाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. यामुळे आता शहरातील व्यायामशाळा पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या. अनेक सदस्यांना व्यायामशाळा सुरू झाल्याची माहिती नसल्याचे व्यायामशाळा चालकाकडून सदस्यांना मेसेज आणि फोन करून माहिती दिली जात आहे.
एकीकडे व्यायामशाळा सुरू झाल्या असल्या तरी दुसरीकडे महापालिकेने ठिकठिकाणी उभारलेल्या ओपन जिम अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे सकाळी व्यायामासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. ओपन जीमचे साहित्य वापरू देण्याबाबत कोणत्याही सूचना महापालिकेकडून प्राप्त झाल्या नसल्याचे सुरक्षा रक्षकांनी नागरिकांना सांगितले. खासगी जिमचे शुल्क भरणे सर्वांनाच शक्य नसते.
तसेच मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिक देखील हलक्या फुलक्या व्यायामासाठी पालिकेच्या ओपन जिमचा वापर करत होते. बंद जागेत असलेल्या व्यायामशाळा सुरू करतात. मात्र खुल्या वातावरणात असलेल्या ओपन जीम बंद ठेवण्यामागे महापालिकेचा नेमका काय हेतू आहे, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
रेशनच्या धान्याने जगविले
गेले आठ महिने जिम बंद असल्याने प्रशिक्षकांवर उपासमारीची वेळ आली होती. याबाबत बोलताना एक प्रशिक्षक म्हणाला, गेल्या आठ महिन्यात सर्व बचत संपली. मित्रांकडून उसने पैसे घेतले. मात्र सरकारने दिलेल्या रेशनवरील धान्याने आम्हाला जगविले. भविष्यात अशी वेळ कोणावरही येऊ नये.