वाराणसी, – येथील ज्ञानवापी मशीद संकुलाच्या व्हिडिओग्राफी सर्वेक्षणाचे काम सोपवलेल्या आयोगाला याचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी जादाचा वेळ लागणार आहे. त्यासाठी आयोग स्थानिक न्यायालयाकडे अतिरिक्त वेळ मागणार आहे. हा अहवाल तयार करण्याचे काम अद्याप अपुर्ण आहे असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
न्यायालयाने याआधी आयोगाला मंगळवारपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सहाय्यक आयुक्त अजय प्रताप सिंग म्हणाले, की न्यायालयाच्या आदेशानुसार, ज्ञानवापी मशीद संकुलाचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण 14 मे ते 16 मे या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत झाले आणि त्याचा अहवाल आज न्यायालयात सादर केला जाणार होता. मात्र, तो तयार न झाल्याने आम्ही आज (मंगळवारी) न्यायालयात अहवाल सादर करू शकत नाही. आम्ही न्यायालयाकडून अतिरिक्त वेळ मागणार असून, न्यायालयाने कितीही वेळ दिला तरी त्या अवधीत आम्ही अहवाल सादर करू, असे सिंग म्हणाले.
ही मशीद प्रख्यात काशी विश्वनाथ मंदिराजवळ स्थित आहे,तिच्या बाहेरील भिंतींवरील हिंदु मूर्तींसमोर दैनंदिन पुजाअर्चा करण्याची परवानगी स्थानिक महिलांनी मागितली आहे. त्यांच्या याचिकेवर तेथे सध्या सुनावणी सुरू आहे. व्हिडिओग्राफी सर्वेक्षणादरम्यान तेथे शिवलिंग सापडल्याचे समोर आल्यांवर स्थानिक न्यायालयाने सोमवारी ज्ञानवापी मशीद संकुलातील तलाव सील करण्याचे आदेश दिले होते.
तथापि मशिद व्यवस्थापनाने मात्र जी वस्तु तेथे आढळून आली ती शिवलिंग नव्हती तर तलावातील कारंजाचा तो भाग होता असे म्हटले आहे. न्यायालयाने नियुक्त केलेले तीन वकिल आयुक्त, दोन्ही बाजूंचे प्रत्येकी पाच वकील आणि एक सहाय्यक यांच्या देखरेखेखाली व्हिडिओग्राफी पथकाने हे सर्वेक्षण केले.