विनोद मोहिते/इस्लामपूर: लॉकडॉन मधील कंटाळा दूर करण्यासाठी महिलांनी एकत्रित काढलेली ट्रीप चिमुकलीच्या जीवावर बेतली. कृष्णा नदीच्या पात्रातून पाच वर्षांची चिमुरडी वाहून गेली.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बहे येथे हा प्रकार घडला. निसर्गरम्य रामलिंग बेटावर खेळणारी मुलगी डोळ्यादेखत वाहून गेल्याने आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आज बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता हा प्रकार घडला. जेनिषा भवरलाल पोरवाल (वय ५) असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.
जोरदार पाण्याच्या प्रवाहातून ती वाहत गेल्याने रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात तिचा शोध सुरु होता. बोरगाव येथून बोट घेत तरुणांनी शोधकार्य करताना जेनिषा हिने पाठीवर अडकवलेली कपडे असलेली सॅक नदी पात्रात मिळून आली. मात्र ती मिळून आली नाही.
पोरवाल कुटूंबाचे लाल चौक परिसरातील कन्या शाळे जवळ शालिमार कापड दुकान आहे. या कुटुंबातील महिलांसह परिसरातील आठ-दहा महिला एकत्रित येऊन रामलिंग बेट परिसरात छोटी ट्रिप काढली. दुपारी सर्व महिला चार चाकीतून बहे येथे गेल्या होत्या.
बेटावर फिरण्याठी गेल्यावर सायंकाळी साडे चार च्या सुमारास मंदिर परिसरात असणाऱ्या हेलिपॅडजवळ सर्व महिला एकत्रित आल्या होत्या. यावेळी खेळत असणारी जेनिषा नदीच्या पात्रात पडली. तिने आरडाओरडा केला.
पाण्यात मुलगी गटांगळ्या खात होती. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती प्रवाहासंगे वाहून गेली. डोळ्यासमोर मुलगी वाहून गेल्याने आईने आक्रोश केला. महिलांनी आरडाओरडा केला पण तिथे कोणी पुरुष व्यक्ती नसल्याने महिला घाबरून गेल्या.
यातील एका महिलेने हा प्रकार तातडीने पोरवाल कुटूंबाला कळविला. घाबरलेल्या अवस्थेत लाल चौक, गांधी चौक परिसरातील तरुणांनीं रामलिंग बेटावर धाव घेतली. नगरसेवक अमित ओसवाल, माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या गावातील आपल्या मित्र परिवाराला माहिती देत सतर्कता म्हणून नदी काठी शोध मोहीम राबवली. बोरगाव येथील बोट घेवून नदी पत्रात शोध कार्य राबवले.
या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ,पोलीस हेड कॉन्टेबल बाजीराव पाटील, पोलीस नाईक अमोल चव्हाण, गणेश शेळके, विनय माळी यांनी शोधकार्य केले. रात्री उशिरापर्यंत जेनिषाचा शोध लागला नाही.
हसत खेळत घरी वावरणारी आपली एकुलती एक मुलगी जेनिषा डोळ्यासमोर वाहून गेल्याने आई आणि आतां ती घरी नसणार या भावनेने वडील भवरलाल यांची अवस्था पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. गांधी चौक व लाल चौक परिसरात शोककळा पसरली होती. जेनिषाचा ही येथील विद्यानिकेतन स्कूल मध्ये युकेजीच्या वर्गात शिकत होती.
जेनिषाचा शोध घेण्यासाठी इस्लामपुरातील ३० हुन अधिक तरुण पोलिसांच्या मदतीने शोध कार्य करीत होते. नगरसेवक अमित ओसवाल, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सोमनाथ फल्ले, पिंट्या ठाणेकर यांच्या सह तरुणांनी बहे येथे थांबून होते. रात्री उशिरा प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. व्हाईटआर्मीचे जवान बोलावण्यासाठी पर्यत सुरू होते.