युनायटेड नेशन्स, – युक्रेनमधील मानवतावादी युद्धविरामासाठी ताबडतोब व्यवस्था करण्यासाठी संयुक्तराष्ट्रांच्या पुढाकाराने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ज्यायोगे अत्यंत गरजेच्या ठिकाणी आवश्यक ती मदत वितरणाला अनुमती मिळावी आणि राजकीय वाटाघाटींचा मार्ग मोकळा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संयुक्तराष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेर्रेस यांनी सोमवारी सांगितले की त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवतावादी ऑपरेशन्सचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ यांना रशिया आणि युक्रेन मध्ये युद्धविरामाची शक्यता तपासण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे. ग्रिफीथ यांनी त्यासाठी आधीपासूनच प्रयत्न सुरू केले आहेत.
संयुक्तराष्ट्रांतील सुमारे 140 राष्ट्रांच्या प्रचंड बहुमताने, युक्रेनमधील संघर्ष तात्काळ थांबवण्याची मागणी दोनदा करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर आता संयुक्तराष्ट्रांतर्फे प्रत्यक्ष प्रयत्न हाती घेणे गरजेचे आहे त्यानुसार आम्ही हे प्रयत्न करीत आहोत असे गुटेर्रेस यांनी सांगितले.
रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केल्यापासून, हजारो लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, 10 दशलक्ष लोक विस्थापित झाले आहेत, घरे, शाळा, रुग्णालये आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांचा नाश झाला आहे. अन्न आणि इंधन साधनांचे तेथील दर आकाशाला भिडकले आहेत. युक्रेन मधील दैन्य न पहावणारे आहे. त्यामुळे तेथील नागरीकांच्या मदतीसाठी तरी काही भागांमध्ये युद्धविराम लागू होणे गरजेचे आहे असे संयुक्तराष्ट्र प्रमुखांनी म्हटले आहे.