संयुक्त राष्ट्रे – अमेरिकेने इराणवर पुन्हा निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. तथापि, या निर्बंधांना संयुक्त राष्ट्रांची मान्यता नाही, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तेनिओ गुटेर्रेस यांनी घोषित केले आहे. त्यांची ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकापुरस्कृत निर्बंधांना जोपर्यंत सुरक्षा परिषदेची मान्यता मिळत नाही तोपर्यंत संयुक्त राष्ट्र संघटना या निर्बंधांचा पुरस्कार करणार नाही. सरचिटणीसांच्या या घोषणेमुळे ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
अमेरिकेने कालच इराणवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू केले जात असल्याची घोषणा केली होती. पण जगातील अनेक देशांनी अमेरिकेने परस्पर केलेल्या या घोषणेला विरोध केला होता. त्यामुळे अमेरिका याबाबतीत एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता तर खुद्द संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांनीच आमचा अमेरिकेच्या निर्णयाला पाठिंबा नाही, असे स्पष्ट केल्याने अमेरिकेची स्थिती आता अत्यंत बिकट झाली आहे.
आता सुरक्षा मंडळाच्या निर्णयावरच अमेरिकेच्या या निर्णयाचे भवितव्य अवलंबून असणार आहे, तथापि, संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात जी पंधरा राष्ट्र सदस्य आहेत त्यातील बहुतेकांनी अमेरिकेचा हा निर्णय धुडकावून लावला आहे. त्यामुळे सुरक्षा मंडळात अमेरिकेला किती पाठिंबा मिळणार हाही प्रश्नच आहे.