Sanjay Raut vs Srikant Shinde : कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलिस स्टेशनमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. हिललाईन पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडला. या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आले. यावरून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षात आता गॅंगवॉर सुरु झाल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. एकीकडे या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असतानाच आता पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावरुन संजय राऊत यांनी ट्वीट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “मा. गृहमंत्री देवेंद्रजी जय महाराष्ट्र! महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात, गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण?” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
मा. गृहमंत्री देवेन्द्रजी
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे.पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात!
गुंडांचे इतके बळ का वाढले?
या परिस्थितीस जबाबदार कोण?
काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील… pic.twitter.com/jnmgurI5gm— Sanjay Raut (@rautsanjay61) February 5, 2024
पुढे राऊत यांनी लिहिले की, “काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत.”
हेमंत दाभेकर कोण आहे?
हेमंत दाभेकर हा शरद मोहोळ याचा अत्यंत जवळचा व्यक्ती मानला जातो. तो गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहळ सोबत होता. गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहळ सोबत हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा सध्या जामिनावर बाहेर आहे. यातच आता खासदार श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा हेमंत दाभेकर याने दिल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.
पार्थ पवार आणि गजा मारणेची भेट
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि गजा मारणेच्या भेटीचे फोटो समोर आले होते. पार्थ पवारांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि त्यांनी मारेणेंच्या घरी भेट दिली होती. मात्र या भेटीवरून विरोधकांनी टीका केली होती.