अहमदाबाद – आयपीएल २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आज गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव करत चषक आपल्या नावावर केला. गुजरात संघाची ही पहिलीच आयपीएल स्पर्धा होती. स्पर्धेच्या १५ व्या पर्वात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यामध्ये देखील गुजरातने कामगिरीत सातत्य राखले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानचा डाव 20 षटकांत 9 बाद 130 अशा साधारण धावसंख्येवर रोखल्याने गुजरात हा सामना सहज जिंकेल असे चित्र निर्माण झाले होते.
मात्र राजस्थानने वृद्धिमान साहा (५) व मॅथ्यू वेड (८) यांना स्वस्तात तंबूत धाडत सामन्यामध्ये चुरस आणली. परंतु चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कर्णधार हार्दिक पंड्या व सलामीवीर शुभमन गिल यांनी संघाचा धावफलक हलता ठेवत ६३ धावांची भागीदारी केली. गुजरातची धावसंख्या ८६ असताना पंड्याला बाद करण्यात राजस्थानला यश आले मात्र तोपर्यंत विजय गुजरातच्या टप्प्यात आला होता. डेव्हिड मिलर ३२ व सलामीवीर शुभमन गिलने नाबाद ४५ धावांची खेळी करत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या जोस बटलरची विकेट पडली आणि राजस्थान रॉयल्सच्या डावाची घसरगुंडी उडाली. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्यासह अन्य गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव 20 षटकांत 9 बाद 130 अशा साधारण धावसंख्येवर रोखला गेला.
देशातील सर्वात जास्त प्रेक्षकक्षमता असलेल्या या मैदानावर तब्बल 1 लाख 32 हजार प्रेक्षक उपस्थित होते. मात्र, स्पर्धेत सातत्याने धावा करणारे राजस्थानचे फलंदाज शरणागती पत्करताना दिसले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय साफ चुकीचा ठरला.
खरेतर त्यांच्या डावाची सुरुवात बटलर व यशस्वी जयस्वालने थाटात केली होती. मात्र, जयस्वाल 16 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार यांच्या मदतीने 22 धावांवर परतला. तसेच यंदाच्या स्पर्धेत चार शतके व चार अर्धशतके फटकावताना 800 पेक्षा जास्त धावा करणारा पर्पल कॅपचा मानकरी बटलर या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही व इथेच राजस्थानच्या डावाला खिंडार पडले.
बटलर 39 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत 35 चेंडूत 5 चौकार फटकावले. तो बाद झाल्यावर मात्र रियान पराग 15, कर्णधार सॅमसन 14, शेमरन हेटमायर व ट्रेन्ट बोल्ट प्रत्येकी 11 धावा करून बाद झाले. गुजरातचा कर्णधार पंड्याने सर्वाधिक 3 गडी बाद केले. त्यातही त्याने यंदाच्या स्पर्धेत तुफान भरात असलेल्या बटलरला बाद करत संघाच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर दूर केला. त्याला साथ देताना श्रीनीवासन साई किशोरने 2 गडी बाद केले. रशिद खान, यश दयाळ व महंमद शमी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.