जयपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचा प्रचार करण्यासाठी दर आठवड्याला गुजरातचा दौरा करत आहेत. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्या राज्यात तळ ठोकून आहेत. त्यातून गुजरातचा निकाल चकित करणारा असेल असे वाटते, असे भाकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी केले.
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने गेहलोत यांच्यावर वरिष्ठ निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे गेहलोतही वारंवार प्रचारासाठी गुजरातचे दौरे करत आहेत. त्या राज्यात प्रदीर्घ काळापासून भाजप सत्तेवर आहे.
मागील निवडणुकीपर्यंत गुजरातमध्ये भाजपचा पारंपरिक प्रतिस्पर्धी कॉंग्रेस पक्षच होता. मात्र, यावेळी आपही ताकदीने निवडणूक लढवत आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकीला तिरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.