दोहा – सौदी अरेबिया व अर्जेन्टिना यांच्यातील सामन्याची पुनरावृत्ती ठरावी असाच सामना बुधवारी जपान व बलाढ्य जर्मनी यांच्यात झाला. सामन्याच्या 33 व्या मिनिटाला जर्मनीचा गोल झाला व त्यानंतर अखेरची काही मिनिटे बाकी असताना पिछाडीवर असलेल्या जपानने दोन धडाकेबाज गोल केले.
सामन्यात वारंवार जपानच्या खेळाडूंना स्लेजिंग करत असलेल्या जर्मनीचे अखेर गर्वहरण झाले व त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात जर्मनीच्या इके उदोगानने जपानचा बचाव भेदताना 33 व्या मिनिटाला गोल केला.
पहिला हाफ संपला तोपर्यंत जर्मनीचीच 1-0 अशी आघाडी राहिली. दुसरा हाफ सुरू झाल्यावरही जर्मनीचा बचाव जपानला भेदता येत नव्हता. मात्र, रित्सु दोआनने 75 व्या तर, ताकुमा आसानोने 83 व्या मिनिटाला गोल केले व जपानने 2-1 अशी भक्कम आघाडी घेतली. यानंतर वाढीव सात मिनिटांच्या खेळातही जर्मनीला गोल करता आला नाही व धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.
मोरोक्को-क्रोएशिया गोलशून्य बरोबरी
या स्पर्धेत झालेला मोरोक्को व क्रोएशिया यांच्यातील लढत गोलशुन्य बरोबरीत संपली. गत स्पर्धेतील उपविजेत्या क्रोएशियाला या सामन्यात एकही गोल करता आला नाही. या सामन्यातील बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला आहे. आता या दोन्ही संघांना पुढील सर्व सामने जिंकले तरच बाद फेरीच्या आशा कायम राखता येणार आहेत.