नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने आज गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर लगेचच आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत गुजरातमध्ये आपल्याच पक्षाचा विजय होणार असल्याचा दावा केला आहे.
गुजरातची जनता यावेळी राज्यात मोठ्या परिवर्तनाच्या तयारीत असून आमचा विजय होणार आहे असे ट्वीट केजरीवाल यांनी दुपारी बाराच्या सुमारास केले. त्यानंतर त्यांनी लगेचच दीड वाजेच्या सुमारास एक व्हिडिओही जारी केला. विशेष म्हणजे या 1 मिनिटाच्या व्हिडिओत त्यांनी मतदारांशी गुजराथी भाषेत संवाद साधला आहे.
Gujarat Election: निवडणुकीची घोषणा होताच पीएम मोदी लागले कामाला https://t.co/7Eo3praMz4
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 3, 2022
आपल्याला कुटुंबातील सदस्य, मुलगा, भाऊ मानत असल्याबद्दल गुजरातच्या जनतेचे त्यांनी आभार मानले असून राज्यात मोफत वीज, मुलांसाठी चांगल्या शाळा, चांगल्या आरोग्य सुविधा देणार असून राज्याला महागाईपासूनही मुक्ती देणार असल्याचा दावा त्यांन व्हिडिओत केला आहे. केवळ एक वेळा आम आदमी पक्षाला मत द्या, तुमचा भाऊ बनून राहीला असे आवाहन त्यांनी केले आहे.
90-95 जागा जिंकणार –
दरम्यान, गुजरात विधानसभेच्या 182 पैकी 90 ते 95 जागा यावेळी आम्ही जिंकणार असल्याचा दावा आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. आमचा वेग असाच राहीला तर 140 ते 145 जागाही जिंकू असे त्यांनी म्हटले आहे. लोक भाजपच्या 27 वर्षांच्या राजवटीला उबगले आहेत. भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस हे मित्र पक्ष आहेत व त्यांची मैत्रीपूर्ण लढत होत असते असेही भारद्वाज यांचे म्हणणे आहे. दिल्लीप्रमाणेच मोफत वीज, उच्च दर्जाचे शिक्षण, जागतिक दर्जाचे मोहल्ला क्लिनिक या विषयांवरच ही निवडणूक होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.