अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी एकूण 788 उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्या उमेदवारांपैकी 211 जण करोडपती आहेत. पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवणारे 27 टक्के उमेदवार 1 कोटी रूपयांपेक्षा अधिक किमतीच्या मालमत्तेचे मालक आहेत.
सत्तारूढ भाजपचे सर्वांधिक 79 उमेदवार करोडपती आहेत. त्याखालोखाल कॉंग्रेसच्या 65, तर आपच्या 33 उमेदवारांचा करोडपतींमध्ये समावेश आहे.
भाजपचे रमेश टिलाला सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ते 175 कोटी रूपयांच्या मालमत्तेचे धनी आहेत. त्याखालोखाल कॉंग्रेसचे उमेदवार इंद्रनिल राजगुरू यांच्याकडे 162 कोटी रूपयांची मालमत्ता आहे. क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यांच्या पत्नी रिवाबा या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
त्यांनी 97 कोटी रूपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. अपक्ष उमेदवार भुपेंद्र पटोलिया यांनी त्यांच्याकडे शून्य मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. त्या राज्यात पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबरला मतदान होईल.