पालकमंत्री राम शिंदे यांना पुन्हा जोरदार धक्का

सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती राजश्री मोरे, जिल्हाउपाध्याक्ष सुर्यकांत मोरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जामखेड: पालकमंत्री राम शिंदे यांना जोरदार धक्का बसला असून, जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती राजश्रीताई मोरेे. भाजपचे जिल्हाउपाध्याक्ष सुर्यकांत मोरे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. कर्जत मधील राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात अनेक भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने जामखेड मध्ये राजकिय भुकंप झाले असून. हा शिंदे यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचे वारे जोरदार वाहू लागले असुन, पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केल्याने पालकमंत्र्यांना जोरदार धक्के बसत आहेत. कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात जामखेड पंचायत समितीचे विद्यमान सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती राजश्री सुर्यकांत मोरे व त्यांचे पती भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष सुर्यकांत मोरे तसेच शिंदे यांचे खाजगी स्वीय सहायक अशोक ध्येंडे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. तसेच अमृत महाराज डुचे यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. भाजप कर्जत युवा तालुकाध्यक्ष शिवकुमार सायकर यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

यावेळी बोलताना पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड म्हणाले की, माझी भाजप मध्ये घुसमट होत होती. आज पर्यत अनेक अपमान सहन करत होतो. आज मी खऱ्याअर्थाने मोकळा झालो आहे. आज मला खरी झोप लागेल. रोहित पवार यांच्या मुळे मला पक्षात येण्याची संधी मिळाली आहे. तर सुर्यकांत मोरे आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या दहा वर्षातील माझी खदखद आज बाहेर आली आहे. आम्ही दिल्लीची सत्ता सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बिनशर्त आलो आहे. आता राष्ट्रवादीचे स्टेज मोठे करा, आता माझ्या मागे रांग लागणार आहे. असेही मोरे म्हणाले त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात अनेकांचे पक्षांतर होणार असल्याची चर्चा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.